कथा३ - बकुळीचा गजरा
बकुळीचा गजरा
थकलीस का ग कुसुम? जेव्हा आजी नातवांना खाली स्कूल बसपाशी सोडून आल्या तेव्हा नानांनी आपल्या बायकोला विचारलं. आजींनी हसून मानेनेच नाही म्हटलं. घर रिकामं झालं होतं.अकरा वाजेपर्यंत नुसती गडबड. सून, मुलगा दोघांची ऑफीसात जायची तयारी.त्यात नातू आणि नात हायस्कूलात आता
त्यामुळे वाढलेला अभ्यास. त्यांची तयारी,डबे.सगळ्या कामांना बाई होती .त्यामुळे कुसूम आजी आणि नानांना तो भार पडायचा नाही.पण आताशा दोन बेडरूम फ्लॅट लहान पडू लागला होता. मुलांना अभ्यासाकरता स्वतंत्र खोली असणं गरजेचं झालं होतं.त्यामुळे सून मुलगा यांत रविवारी वरचेवर हल्ली वाद होत.घरातील शांतता लोपली होती.नोकरी असूनही दोघांची मुंबईत मोठं घर घेणं अशक्य होतं.त्यात मुलांच्या ट्यूशन्सची अमाप फी,महिन्याचा खर्च, आजी आजोबांची औषधं अवघड होत चाललं होतं.हे कुसूम आजी आणि नानांना स्पष्ट दिसत होतं. आपलं ओझं होऊ लागलंय किंवा आपली अडचण आपल्या मुलाच्या संसारात होतेय असं त्यांना जाणवू लागलं.आणि म्हणूनच गेले कित्येक दिवस चाललेल्या या ओढाताणीला त्यांनी पूर्णविराम दिला होता.अगदी कोणालाही न कळू देता काळजावर दगड ठेवून एक निर्णय घेतला होता.मुंबईपासून दूर एका वृध्दाश्रमात राहण्याचा.
नानांची आयुष्यभराची जी काही पुंजी होती ती दोघांनी वृध्दाश्रमात भरली होती. कालच तसं ते मुलगा सुनेशी सविस्तर बोलले होते आणि स्वतःसाठी आणि मुलांसाठी सुध्दा जगणं सोपं केलं होतं.संध्याकाळी नातवंडं परत येईपर्यंत कुसूम आजी,नाना निघणार होते.
नातवांच्या मुलाच्या सुनेच्या भल्यासाठीच आणि स्वतःसाठीदेखील.
ठरल्याप्रमाणे दोघे दोन ट्रंका घेवून वृध्दाश्रमात पोहोचले .नवीन समवयस्क मित्र मंडळींना भेटून छान वाटलं दोघांना.
सकाळ उजाडली .आज दोघांच्या नवीन आयुष्याचा पहिला दिवस होता.
“हॅपी चाॅकलेट डे कुसूम” “इश्श,तुमचं आपलं काहीतरीच हं…हे काय वय आहे का आपलं? पोरं,सुनबाई ,नातवंडं
काय म्हणतील पाहिलं तर…हसतील सारे..म्हणतील आजी आजोबा वेडे झालेत.”
“म्हणू दे म्हटलं तर…
आपण नाही का रोज नातवांना समोरच्या वाण्याकडून कॅडबरी चाॅकलेट आणून द्यायचो देवळातून येताना! आज मला तुला द्यायचंय, माझ्या बायकोला.” “इश्श”
“एवढी काय लाजतेस? शाळेत तर मुद्दामून उशीरा यायचीस . मागे बसायला जागा मिळावी म्हणून. माझ्या शेजारीच. चितळे मास्तर भिंगाच्या चष्म्यातून पाहत मिश्किल हसायचे.ते सोडून घरच्यांना अजूनही वाटतंय की आपलं अरेंज मॅरेज आहे म्हणून. हो कशी विसरेन मी.”
“न चुकता तुम्ही दोन गोष्टी आणायचात माझ्याकरता.
बकुळीचा गजरा आणि लिमलेटच्या गोळ्या.
अजूनही त्या फुलांचा दरवळ आहे आजूबाजूला.
कसे भुर्रकन उडून गेले ना ते तरूणीईतील दिवस!”
“कोण म्हणतं तू म्हातारी आजीबाई आहेस..
ओ मेरी जोहराजबी… तू अभीतक हसीन और मैं जवाब…तुझपे कुरबान मेरी जान मेरी जान….”
“अहो बलराज सहानी,तुम्हाला पण हॅपी चाॅकलेट डे!”
©️®️ श्रध्दा(इरावती) सुदामे
मोबाईल - ८८३०७८४१०३
३जानेवारी२०२६
Comments
Post a Comment