कथा २ - ऋणानुबंध
कथा - ऋणानुबंध
हुश्श…लागलं एकदाचं घर.नवीन शहर,भाडेतत्त्वावर घेतलेलं घर, अनोळखी लोकं.
त्यात मला नुकताच चवथा महिना
सुरु झालेला.गायनॅकॉलॉजिस्ट शोधण्यापासून सुरुवात.प्रचंड दडपण आलेलं.घरकामाला मोलकरीण शोधणे ,मोठीची नवीन शाळेत ॲडमिशन घेणे हैराण झाले असताना दमून रात्री लगेचच झोप लागली. सकाळी डोअर बेल वाजल्याने जाग आली.दारात एक तिशीतली बाई उभी होती.”तुमी नवीन आल्यात ना हिथं? मी कामच हुडकंत व्हते ताई.”सुनिता नाव होतं तिचं.माझ्या घराच्या जवळच रहात होती. चक्क अंबाबाईने माझं ऐकलं.माझी मदतनीस पाठवली होती.लगेच मी सुनिताला कामाला लावून घेतलं.
सुनिताचं काम एकदम चोख होतं.
आपलंच घर समजून काम करायची. लहान तीन मुलगे तिला.नवरा हिच्याच कमाईवर होता.तरी हिच्यावर पाळत ठेवायचा.” लई संशय घेतो ताई .घरी जायला कधी उशीर झाला तर पोत्यात बांधून राधानगरीच्या धरणात सोडून देईन म्हणतो ताई”
माझं मन सुनिताच्या गोष्टी ऐकून गलबलून येई.मी म्हणायची तिला आम्ही इथून गेलो की तू पण आमच्याबरोबर कोल्हापूर सोडून आमच्या गावी चलशील. ती कसनुसं हसत कामाला लागे.
सुनिताच्या हाताला चव होती.मला आणि होणाऱ्या बाळाला त्रास होणार नाही असा ती स्वयंपाक करत असे.मला म्हणायची ताई बाळाची हाडं मजबूत व्हायला पाहिजे, मान लवकर धरल बघा तुमचं बाळ.नाॅनव्हेज खाऊ घालत जाईन मी तुम्हाला.अगदी प्रेमाने जीव ओतून करायची.वहिनीसाहेब अंबाबाई येणार पोटी तुमच्या ऐन नवरात्रात. मी तिचं हे बोलणं गंमत म्हणून ऐकायची. ऐन गणपती उत्सवात नको बाळंतपण एवढं वाटायचं . माझ्या शेजारीच अग्रवाल म्हणून श्रीमंत कुटूंब होतं. त्यांच्याकडे सुनिता बरेच वर्षांपासून कामाला होती.खरंतर त्यांना ती माझ्याकडे काम करतेय हे अजिबात आवडायचं नाही.सतत मालकी हक्क गाजवत बिचारीवर.मला जरा विचित्र वाटलं. पण काहीच दिवसात याचंही उत्तर मिळालं.सुनिताने दहा हजार रुपये उचलले होते अग्रवाल कुटूंबाकडून.त्या बदल्यात वाटेल तितकी कामं करून घेत बिचारीकडून.दुष्टपणाचा कळस होता.
एक दिवशी दहा वाजले तरी सुनिता आली नव्हती.स्वयंपाक राहिला होता.माझी औषधं घ्यायची होती तेवढ्यात दारावरची बेल वाजली.दार उघडून बघते तर तिचा दहा वर्षाचा मुलगा उभा टिफीन घेवून. हे काय?म्हटल्यावर टिफीन उघडून बघा असं म्हणाला. रिकामा टिफीन आणि आत एक चिठ्ठी होती.समोरच्या अग्रवाल आजी बारीक नजर ठेवून होत्याच. मी टिफीन आत आणून चिठ्ठी वाचली.
सुनिताला ताप चढला होता.आज ती कामाला येऊ शकणार नव्हती.तिने लिहिले होते ती माझ्यासाठी घरनंच नाॅनव्हेज बनवणार होती.भाकरी, भात सगळं तासाभरात पाठवते असं लिहिलं होतं. मला आराम करा असं म्हणून तिचा मुलगा निघून गेला.मी फक्त विचारच करत राहिले की कुठली मोलकरीण तापात फणफणत असताना मालकिणी साठी…माझ्याकडे शब्द नव्हते.कुठल्या जन्मीचा ऋणानुबंध आहे हिच्याशी माझा?
थोड्यावेळात सुनिताचा मुलगा भरलेला गरम गरम टिफीन घेवून आला. सुनिताच्या हातचं जेवताना माझे डोळे पाणावले अन् ओठातून नकळत शब्द निघाले…
अंबाबाईचं नवरात्र सुरु झालं.
ललित पंचमीचा दिवस.पाचवी माळ आणि माझ्या प्रसृती वेदना सुरु झाल्या.
मला हाॅस्पिटलमध्ये ॲडमीट करावं लागलं. वहिनीसाहेब मी आहे असं म्हणत माझा हात घट्ट धरून सुनिता होती हाॅस्पिटलमध्ये.
थोड्याचवेळात माझी शुध्द हरपली. भूल उतरली तेव्हा बाळाच्या रडण्याचा आवाज आला.नर्सने सांगितलं मुलगी झाली होती.मी वळून पाहिलं पलंगाजवळ सुनिता हसत उभी होती .आनंद अश्रू डोळ्यांत, मला म्हणत होती “ मी नव्हतं म्हणलं वहिनीसाहेब अंबाबाई तुमच्या पोटी येणार.”असं म्हणून तिने बाळाला माझ्या मांडीत दिलं .अन् मला मात्र गाभाऱ्यातील अंबाबाई सुनिताच्या रूपात दिसत होती.मी नतमस्तक झाले होते.माझे हात आपोआप जोडले गेले होते.डोळ्यांतून नकळत अश्रू वहात होते.
कोल्हापुरात मला साक्षात “अंबाबाई” चे दर्शन झाले होते.
©️श्रध्दा(इरावती)सुदामे
मोबाईल - ८८३०७८४१०३
२जानेवारी २०२६

Comments
Post a Comment