जागतिक काव्यदिनानिमित्त

 तुषार जोशी यांच्या काही कविता

1) मी अमिताभ बच्चन आहे

आता तू सिलसिलातल्या रेखासारखी

केसांची घनदाट सावली

माझ्या चेहऱ्यावर धर

हे ऐकताच कळते मला

बऱ्यापैकी रोमँटीक मुडमधे

आलिये स्वारी तर

मी कुठेही कमी पडणार नसते हां

मी म्हणते एक मिनिट हं

मग आरशासमोर येऊन

केस मोकळे सोडून

आठवणीने कवळ्या लावून घेते

(अमिताभ ने आधीच लावलेल्या असतात)

दूर कुठेतरी रेडीयोवर

नीला आँसमाँ सो गया वाजायला लागतं

तुझं डोकं मांडीवर घेताच

सगळं आयुष्य आठवायला लागतं

तुझ्या चेहऱ्यावर केसांची (उरलेल्या) सावली धरताना

झालेलं रोमांचित आयुष्य

सुगंधित होऊन जातं

मग वेड्या अमिताभच्या डोळ्यात

टचकन पाणी येतं

तो म्हणतो किती किती

तुझ्यासाठी करायचं राहून गेलं

तेव्हा त्याचा चेहरा हातात धरून मी म्हणते

अमित, तू माझा आहेस हेच तर

किती किती दिलंस रे

आता खरंच कशाची गरज उरते?

ती रात्र सुगंधात न्हाऊन

धुंद नशेत सरते.

           तुष्की नागपुरी

  2)     एकच डेयरी मिल्क 

बस स्टाप वर भेटीन

बघ वेळेवरती येशील

ती मोरपंखी रंगाची

सुंदर साडी नेसशील

.

मग नेहमीसारखे

शेवटचा स्टॉप घेऊ

बसमध्ये मनसोक्त

सगळं बोलून पाहू

.

एकच डेयरी मिल्क

दोघ दोघं खाऊ

हृदयाच्या ठोका चुकवू

हातात हात घेऊ

.

परतताना हळूच पत्र

हातामध्ये ठेव

पुन्हा डोळेभरून बघ

डोळ्यात आणून जीव

.

सोवानिवृत्ती साठीचे वय

आज बाजूला ठेऊ

आपण नवरा बायको

हेपण विसरून जाऊ

.

तुष्की नागपुरी

आयुष्याच्या संध्याकाळी देखील एकमेकांवरील प्रेम किती तजेलदार असू शकतं ह्याचं सुंदर वर्णन वरील दोन्ही कवितांमध्ये तुषार जोशींनी नाजूक आणि हळूवारपणे केलंय.

"मनाच्या कविता"  या काव्यसंग्रहातून 

3) काही तरी माग

काही तरी मागू म्हणतेस

एक रडण्याची जागा देशील?

मी जेव्हा पाऊस होईन

तू भीजण्यासाठी येशील?


काही तरी मागू म्हणतेस

केसात फिरणारा हात देशील?

कधी लागले दुखले तर

तू माझी आई होशील?


काही तरी मागू म्हणतेस

तुझी सगळी दुःखे देशील?

तुला एकटं एकटं वाटताच

सरळ माझ्या कुशीत येशील?


काही तरी मागू म्हणतेस

देशील डोळ्यातलं पाणी

आपण दोघं मिळून गाउया

आयुष्याची राजस गाणी

            तुष्की नागपुरी

       4)  एकदा…

एकदा मला भेटायला

माझ्या घरी येशील

आणि केस मोकळे सोडून

माझ्या जवळ बसशील

मी दोन्ही हातांमधे 

तुझा चेहरा घेईन

रेखिव गहिऱ्या डोळ्यांमधे

बघून हरवुन जाईन

तू विचार माझा राजा

असं काय बघतो?

मी म्हणेन बघतो कुठे?

पावसात भिजतो

मग तू अलगद..

तुझ्या रेखिव 

पापण्या मिटून घेशील

पाऊस ओसरल्यावरचं

निरभ्र आकाश होशील

मग विचार किती वाजले?

वेळ झाली का?

मी म्हणेन हे गं काय राणी

मग तू आलीसच का?

मला जवळ घेउन 

माझी समजून घाल

म्हण राजा सोडून जाताना

माझेही होतात हाल

मग मी तुला

पुन्हा एकदा 

डोळ्यात साठवून घेईन

आणि एकदम 

शहाण्यासारखा

तुला जाऊ देईन

                 तुष्की नागपुरी

                   "भूल" या काव्यसंग्रहातून 

वरील कवितांमधून आपल्याला  cute लव स्टोरीज वाचायला मिळतात.


Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की