कोलाज
केव्हातरी असं वाटतं
तो रिमझिम पाऊस ,कोवळं ऊन,ती थंडी, तो स्पर्श, ओंजळ भरुन घ्यावेत हे क्षण अन् मुठीत बंद करून दडवून ठेवावेत मनाच्या ड्राइव्हमध्ये
केव्हातरी असंही वाटतं..
ती संध्याकाळ, ती टपरी.. वाफाळता चहा ,डोंगरकुशीतील ती भेट.. घ्यावी मऊ शालीत लपेटून अन् साठवावी डोळे मिटून मनाच्या गॅलरीत..
केव्हातरी असंही वाटतं…
चंद्राची कोर,नक्षत्रं, शुक्रतारा,अंग शहारून टाकणारा वारा अन् भेटीची रात्र.. कैद करावे सारे क्लिक करुन मनाच्या कॅमेरात
केव्हातरी असंही वाटतं…
काळजाच्या कोपर्यात कॅनव्हासवर रंगीत कुंचला फिरवला की उमटत जावीत मोहक स्केचेस..करत जावे काॅपीपेस्ट कोलाज फोटोंचे हृदयात एका फोल्डर मध्ये
आणि केव्हातरी असंही वाटतं..
अशीच गोठलेली रात्र पुन्हा यावी हातात काॅफीचा मग , सारंगीचे स्वर ,काॅपी पेस्ट केलेले ऊबदार क्षण … अन् रंगीबेरंगी आठवांचा अल्बम..पाठवून द्यावं तुला हे सारं एका गाठोड्यात बांधून. …विचारावं..
तुलाही असंच होतंय ना?
©️®️ Shraddha(अनामिका)

अप्रतिम. दूसरा शब्दच नाही या शिवाय. किती सुंदर मनातल्या कल्पनांच वर्णन. खरंच तू शब्दांची जादूगार आहेस. हॅट्स ऑफ टू यू. वाचकांचं मन तू बरोबर ओळखलेल आहे निर्विवादपणे.keep it up.
ReplyDelete