गोधडी
माईआजी नेहमीच नातवांना फुलासारखं जपायची.रोज रात्री गोधडी हळूच पांघरायची.
माईआजीची गोधडी जणू आपल्या कुशीत घेवून निजवायची.
दुपार झाली की मानेतून पाठीतून वाकलेली आजी उन्हं अंगावर घेत आवडीचं काम करत बसायची. आधीच बारीक डोळे आजी अजून बारीक करायची.आणि सुई दोरा घेऊन गोधडी शिवत बसायची.
दुधावरच्या सायीसारखी..मऊ
मऊ कापसासारखी..नऊवारी लुगडी घेऊन घडीवर घडी घालायची…
सुखदुःखं, कडूगोड आठवणी ठिगळं लावून जोडायची.. जोडत असताना कितीदा सुई टोचायची अन् रक्ताचा थेंब हळूचकन आजी टिपायची पण टीप उसवू नाही द्यायची.
आपल्या प्रेमळ हातांनी तशीच धावदोरा घालायची.
गोधडी रेडी झाली की दिमाखात दाखवायची. नातवांना गोधडीत घेऊन बागुलबुवापासून लपवायची.थंडीला तर दूर दूर पळवायची.
आताशा आजीचं वयही झालं होतं…थकली होती..
नातवांनी वाड्यात खूप शोधलं एकदिवशी.. पण आजी आता कधीच दिसणार नव्हती ..पोरांच्या आसवांनी ओलिचिंब झाली होती गोधडी.
आजीच्या जाण्याने गोधडीपण हळवी झाली होती. आजीसारखीच सुरकुतली होती ती पण जराशी.
जरा रंगही एवढ्यात फिका झाला होता तिचा.
मात्र आजीच्या मायेचा ऊबदार स्पर्श तसाच होता गोधडीला ..
©️®️श्रध्दा सुदामे
( 8830784103)

Comments
Post a Comment