कोवळं ऊन

आजी रोज दुपारी कलत्या ऊन्हाची झालर अंगावर घ्यायची.जणूकाही किरणांची दुलई पांघरायची.खिडकीतून छान कोवळं ऊन आत यायचं.थंडीत पारा खाली गेला की दुपारचं ऊनही कोवळं वाटायचं.

आजी फणीने केस विंचरत , छानसा अंबाडा घालत ऊन्हात बसायची. तिचे निळसर झालेले डोळे ऊन्हात प्रिझमसारखे चमकायचे. निळ्या लोलकांतून सूर्यकिरणं परावर्तित होऊन निरागस हास्य तिच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर दिसायचं.आणि काय तेजःपुंज दिसतेय असं आजोबा तिला थट्टेने म्हणायचे. सुवर्णरश्मींची पैठणी नेसायला भाग्य लागतं . "काहीतरीच" म्हणत आजी लाजायची.

 आजोबा सकाळी आंघोळ करून सूर्याला अर्ध्य देताना ,नमस्कार करताना  अभिमानाने आजी त्यांना सूर्यपुत्र असं संबोधायची. मग आजोबा समोरच्या अंगणात आरामखुर्चीत रेलून ऊन अंगावर घेत वर्तमानपत्र वाचत बसायचे.पेपर वाचताना अर्धा तासाची डुलकी आजोबांची हमखास असायची.आपण झोपलो होतो छान हे त्यांना कधीच मान्य करायचं नसे.

आजी आजोबांच्या ह्या कोवळ्या ऊन्हाला नजर लागली अचानक. मागच्या वर्षीपासून शेजारी उंच टाॅवर, फ्लॅट बांधकामं सुरू झाली."आपलं कौलारू टुमदार घर सूर्यकिरणांना आवडेनासं झालंय ग हल्ली"..आजोबा आजीला म्हणाले अन् "पिकलं पानासारखी आपण दोघं आणि आपलं घर ." हल्ली आजी आजोबा दोघंही शांत असतात.पूर्वी सारखं मस्करी करत नाहीत.हा आजूबाजूचा बदल रुचला नसावा बहुधा.

रोज सकाळी ओम सुर्याय नमः , मित्राय नमः म्हणताना आजोबांचे  पाणावलेले डोळे कोवळ्या ऊन्हाला शोधत असतात मात्र..

 ©️®️श्रध्दा सुदामे





Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की