आंबटगोड
आंबटगोड
आई काहीतरी गोड कर ना
अगं.. जरा अगोड
सूनबाईऽऽऽ विदाऊट शुगर
अख्खं आयुष्य आई बिचारी
गोड ..अगोड करत होती
साधं वरण तर कधी फोडणीचं..
हवं नको बघत होती.
आमसूल की चिंच? ही तारेवरची कसरत रोज उठून करत होती…
आई बिचारी प्रत्येकाला रोज आवड विचारत होती..दही घालून, बिना दह्याची कोशिंबीर वाढत होती..
आवडी सार्यांच्या प्रेमाने ती हमखास जपत होती.मात्र …एक दिवशी आई सारं काही विसरली..
आंबट गोड करता करता आपलीच चव विसरली..
कुणी नाही विचारलं तरी ….
मला काहीही आवडतं.स्वतःशीच म्हणाली.
स्वतःसाठीही जगायचं असतं हे पण विसरली…
आवडता रंग,आवडीचा पदार्थ, आवडता सिनेमा, आवडतं गाणं…सारं सारं विसरली.मी विचारलं “आई, तुला काय आवडतं?” तर आश्चर्याने
माहीत नाही म्हणाली..विचारच केला नाही गं म्हणाली… तेवढा वेळही नाही म्हणाली.
कुणी कधी मला तसं विचारलं नाही म्हणाली…
मला सगळंच आवडतं असं सहजतेने म्हणाली..
मी तिला विचारलं म्हणून मलाच थॅंक्स म्हणाली…कसनुशी हसली अन्
पदराने डोळे पुसताना.. कचरा गेलाय म्हणाली..आंबटगोड करताना आई ॲक्टींगही विसरली.
वळून तिला पाहताना केविलवाणी वाटली….
©️®️Shraddha Sudame

खरंच आई अशीच असते. फक्त दुसऱ्यासाठी खास करून मुलांसाठी आणि नवऱ्यासाठी मर मर मरते.
ReplyDeleteछोटी असल्याने मुलांना काळात नाही तिची
सहनशीलता, तीच sacrifice, तिची अफाट काम करण्याची शक्ती.
किती सुंदर आणीसोप्या शब्दात तू शब्दांकन
करतेस.
तू शब्दांची jadugarni आहेस.
तुझे कसे आणि किती कौतुक करावे कळत नाही.
खूपच सुंदर निव्वळ अप्रतिम.