बाबा

 दगडाच्या पाटीवर अ आ ई गिरवताना, पाढे, उजळणी पासून.. अगदी शाळेच्या पहिल्या दिवसापासून हात धरून वळण  लावणारा बाबा… 

गणवेषखरेदीपासून नवीन पुस्तकांच्या खाकी कव्हर पर्यंत बरोबर असणारा बाबा. आपल्या बालपणी सोसलेले चटके आपल्या लेकरांना बसू न देणारा, "कुणी घर देेता का घर "म्हणत आपल्या बालपणी अनाथालयात राहिलेला बाबा पोटच्या पोरांना मात्र सदैव तळहाताच्या फोडासारखा जपत आला.काय सांगू बाबा तुमचं बालपण तुमच्याकडून ऐकलं की अजूनही डोळे डबडबतात या लेकीचे ... 

 कसं लिहू या चार ओळींत , डायरीतील एका पानावर जन्मापासून सारं काही जे एका बाबानं लेकरांसाठी केलं… 

शाळा ते काॅलेजपर्यंत हा वटवृक्ष सावलीसारखा असायचा सतत लेकीबरोबर असणारा बाबा…

बघता बघता  दिवसामागून  दिवस , महिने , वर्ष भुर्रकन उडाली.

आणि एक दिवस परकर पोलक्यातली ही लेकही माहेरच्या घरट्यातून उडाली. कळलंच नाही कधी प्रगतिपुस्तकावर सही करता करता  लग्न पत्रिकांवर नाव लिहू लागले बाबाचे हात…प्रथमच त्यावेळी थरथरल्यासारखे वाटले  बाबा तुमचे हात...

कन्यादान करताना किती वेळा डोळे पुसत होतात तुम्ही बाबा..लेकीसाठी झुकत होतात, वाकत होतात… त्यावेळी हा वटवृक्ष थकलेला वाकलेला अजिबात आवडत नव्हता या लेकीला बघायला कारण तो कल्पवृक्ष होता ...या लेकीचा कल्पवृक्ष आता वयोवृद्ध  झालाय, त्याच्या सावली देणाऱ्या विस्तीर्ण  फांद्या आताशा वाकल्यात, बाहू पसरत भुईसपाट झाल्यायेत.. तरी ओरबडताहेत बापाला पोटचे स्वार्थी गोळे,उन्हा तान्हात रस्त्यावर म्हातारा बाप  फिरू लागलाय,झालं माहेर आता परकं लेकीला, उघड्या डोळ्यांनी लेेक एकट्या बापाकडे पाहतेय, छप्पर देतं का छप्पर म्हणत  बाप आभाळाकडे पाहतोय ,आपल्या  जवळच्या माणसांनी बापाचा नटसम्राट केलाय...

   ©️®️श्रध्दा सुदामे 
















Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की