लिमलेटची गोळी
हॅपी चाॅकलेट डे कुसूम! इश्श,तुमचं आपलं काहीतरीच हं…हे काय वय आहे का आपलं? पोरं,सुनबाई ,नातवंडं
काय म्हणतील पाहिलं तर…हसतील सारे..म्हणतील आजी आजोबा वेडे झालेत. म्हणू दे म्हटलं तर…
आपण नाही का रोज नातवांना समोरच्या वाण्याकडून कॅडबरी चाॅकलेट आणत देवळातून येताना! आज मला तुला द्यायचंय, माझ्या बायकोला.इश्श!
एवढी काय लाजतेस? शाळेत तर मुद्दामून उशीरा यायचीस . मागे बसायला जागा मिळावी म्हणून. माझ्या शेजारीच. चितळे मास्तर भिंगाच्या चष्म्यातून पाहत मिश्किल हसायचे.
ते सोडून घरच्यांना अजूनही वाटतंय की आपलं अरेंज मॅरेज आहे म्हणून.
हो कशी विसरेन मी.न चुकता तुम्ही दोन गोष्टी आणायचात माझ्याकरता.
बकुळीचा गजरा आणि लिमलेटच्या गोळ्या.अजूनही त्या फुलांचा दरवळ आहे आजूबाजूला.
कसे भुर्रकन उडून गेले ना ते तरूणीईतील दिवस!
कोण म्हणतं तू म्हातारी आजीबाई आहेस..
ओ मेरी जोहराजबी… तू अभीतक हसीन और मैं जवाब…तुझपे कुरबान मेरी जान मेरी जान….
अहो बलराज सहानी,तुम्हाला पण हॅपी चाॅकलेट डे!
©️®️ श्रध्दा सुदामे

Comments
Post a Comment