अस्तित्व
1)कविता - सुवासिनी
तिच्याशिवाय नुसतंच असतं घर दगड मातीचं…
नुसत्याच दारं खिडक्या बाकी रितेपण...
खरंतर काटकसरीच्या काड्यांनी विणत असते घरटं ही सुगरण…
म्हणूनच तिच्यामुळे येत असतं घराला घरपण…
तिच्याशिवाय असतं सुनं सुनं अंगण
ती म्हणजे अंगणावरील शेणाचं सारवण
पोपडे उडालेल्याभिंतीवर प्रेमाचं लिंपण
ती जळत असते चुलीजवळ… जसं निखार्यातील सरपण
जीव ओतून, चटके सोसून करत असते सगळ्यांसाठी भाजी भाकरी कालवण
आपल्या माणसांचं सुख हीच तिची साठवण..
तिच्यामुळेच असतं सासुरवाशीणचं माहेरपण
तिच्यावीण सुनं बाळाचं बालपण
आजी, आई, आत्या, सासू, मामी, मावशी, मुलगी असेल ती कुणीही
तिच्यामुळेच तर येतं देव्हार्यालाही देवपण..
ती म्हणजे तुळशीसमोरील सडा संमार्जन
सदैव ज्योत बनून जळत राहते ही “सुवासिनी”
जसं अखंड निरांजन
©️®️श्रध्दा सुदामे
2) कविता - अस्तित्व
असतो तोच एक क्षण फसवा फक्त
सुवर्ण मृगाच्या मोहाचा…
आणि होतात पाऊलवाटा उध्वस्त
वाटेवर भेटतात पेटते निखारे
अन् हरवतात ओळखीचे सारे किनारे
सीतेला तरी कुठे टाळता आलं?
ओलांडली ना लक्ष्मण रेषा?
असून नारी दिव्य अति तेजःपुंज
झालीच कशी अपहरणात बंदिस्त?
डोळेझाक करूनी मायावी वृत्तीस
विचारत राहिली मग मावळत्या सूर्यास
साक्षी ठेवून वेदना संदर्भास
अखेरीस जानकी स्वाभिमानी संतप्त
करून बेचिराख नजरा अतीव दुष्ट
दिली हाक धरणीस तिने अती आर्त
देण्या आहुती भूमीच्या गर्भात
युगा युगात चहूवार पुन्हा हेच चित्र
भवताल तोच समाज पुरूषप्रधान
की सत्य उरते फक्त हेच? ..स्त्री आयुष्य
केवळ बलिदान मात्र?
खरंतर जन्मून स्त्रीच्या उदरी हा पुरुष
होईल ना कधीच तिच्या दास्यातून मुक्त
हेच आहे स्त्रीचं चिरकालीन अस्तित्व
©️®️श्रध्दा सुदामे

Comments
Post a Comment