कहा गये वो दिन
फर्ग्युसन रोजनिशी
भाग - 2
आनंदी - फर्ग्युसनला मला भेटलेली ही अजून एक मैत्रिण. आनंदी मणिपूरी होती.आनंदीचे वडील इंफाल विद्यापीठात प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख आणि महाविद्यालयाचे प्राचार्य होते.
आनंदी अतिशय हळवी होती.माझी होस्टेलवरची तर मैत्रिण होतीच शिवाय प्रॅक्टिकल्सची पार्टनर.सुरुवातीला मला वाटायचं हिला मराठी काही समजत नाही त्यामुळे मी सरांविषयी बिनधास्त बडबड करायची मराठीतून आणि एक दिवशी आनंदीने साॅलीड धक्का दिला.मला म्हणाली “ श्रध्दा आय नो मराठी.आय अंडरस्टॅन्ड व्हाॅट यू टाॅक” मी पुरती घाबरले होते पण तिने स्वतःहून वचन दिलं की मी तिच्यावर विश्वास ठेवू शकते असं.मग काय धमाल..मी नेहमी प्रोफेसर लोकांची मिमिक्री करायची.आनंदी हसून हसून लाल व्हायची आणि म्हणायची “श्रध्दा यू मेक मी लाफ,आय कान्ट स्टॉप लाफिंग.”
आनंदी आणि तिचा भाऊ जुळी भावंडं होती. तिचा भाऊ तिला भेटायला आला की ती पटापट लिपस्टिकचा अजून एक थर लावायची अन् पळायची.बार्बी डाॅलसारखे गोल्डन केस, कपाळावर समोर आलेले आणि ओठांना लालचुटुक लिपस्टिक. आनंदीला आश्चर्य वाटायचं की मी लिपस्टिक लावत नाही ,मेकअप करत नाही याचं.या मणिपूरी अजूनही पाच सहा जणी होत्या होस्टेलवर. त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या हातापायांची काय अप्रतिम काळजी आणि निगा ठेवायच्या .
हळूहळू मला मणिपूरी संस्कृती कळत होती.पुणे विद्यापीठात त्यांची संघटना होती.दर रविवारी कार्यक्रम असायचे .त्यात
मणिपूरी नृत्य आविष्कार बघताना
मुख्यतः हातांच्या मुद्रा अतिशय डौलदार शांत संगीताच्या लयीवर जणू हळूवार फुंकर घालतंय असा
भास होई.तसाच नाजूक पदन्यास. घुंगरू नाही पायात .. नाजूक पुष्प माळा फक्त ,भडक वाद्यं नाही केवळ अभिनय. आता मला मणिपूरी हातापायाची एवढ्या भक्तिभावाने पूजा का करीत हे कळलं होतं.आनंदी खूप हळवी होती तशी.माझे आईवडील भेटायला आले होस्टेलवर की तिच्या डोळ्यांत टचकन घरच्या आठवणीने पाणी तरळे.एकदा तिला मी माझ्याबरोबर माझ्या घरी घेऊन गेले होते.महाराष्ट्रीयन जेवण जेवून खुश झाली होती आनंदी.
आईने पेरूचा मेथांबा केला होता तो तिला इतका काही आवडला की नेहमी मला म्हणायची “ ओह आय लाइक दॅट पेरू की सब्जी, प्लीज टीच मी हाऊ टू प्रिपेअर इट.” आता आनंदीला इंग्रजीतून मेथांब्याला काय म्हणतात हे कसे सांगावे हा पु.लं.प्रमाणे “ हिच्या हाताच्या भाजीची सर कशा कशाला म्हणून नाही.हे त्या गोर्या कातड्याला कसे इंग्रजीतून सांगावे?”असा प्रश्न मलाही पडला होता.आनंदी आणि इतर मणिपूरी मेसमध्ये जेवताना रोज दोन तरी हिरव्यागार मिरच्या आधी चावून खायच्या ,पाहूनच डोळ्यांत पाणी यायचं.
आनंदीच्या आईचं नाव कुमुदिनी होतं आणि ती हिंदी गाणी छान म्हणायची असं आनंदीनेच सांगितलं होतं.आनंदी पण सुंदर गायची कधी कधी चुकीचे लिरिक्स
गायची पण सूर अचूक असायचा. “ज्वेल थीफ”मधील लताच्या आवाजातील हे अप्रतिम गाणं सतत आनंदी गायची.
“रुला के गया सपना मेरा
बैठी हूँ कब हो सवेरा, रुला …”
बहुतेक मणिपूरी मुली पुण्यातील मुलांशी लग्न करून पुण्यातच स्थायिक झाल्या होत्या.आनंदीला मात्र फायनल परीक्षा झाल्यावर मणिपूरला परत जावं लागलं होतं कायमचं.आमचा मणिपूरी पारंपरिक वेशातील फोटो बघून नेहमीच तिची आठवण येते.
पाण्यात बिस्किटं बुडवून खाणारी अकरावीत शिकणारी पण माझी जिवलग मैत्रिण ज्योत्स्ना, मी आळशी आणि हळू हळू काम करणारी म्हणून मला मागच्या जन्मी अजगर असली पाहिजे श्रध्दा असं म्हणणारी अमेरिकेत स्थायिक झालेली संज्योत, तब्येतीने तोळामासा असलेली विदुला होस्टेलसमोरील वैशाली हाॅटेलातील परीक्षेच्या दिवसात मायेने खाऊ घालणारे वेटर काका, होस्टेलवर कुणाचे नातेवाईक भेटायला आल्यावर धावत येऊन निरोप देणारे“भैय्याजी”,आमची कामं करणाऱ्या मावशी आठवल्या की हाच प्रश्न येतो
“ कुठे असतील ही सध्या माणसं? मग एकांतात किशोरकुमारच्या ओळी आठवतात-
जिंदगी के सफर मे गुजर जाते है
वो मकाम…फिर नही आते,वो फिर नही आये..
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जून२०२५
श्रध्दा सुदामे
नागपूर, शुक्रवार, ६ जून २०२५

Comments
Post a Comment