फॅमिली ट्री
कुणी म्हणत होतं सोन्याची फुलं उधळायची असतात बरं का …तर कुणी सोन्याची पणती करायची आता..
पाळणा सजला होता. माळा लावून सजावट झाली होती.
घरातील बायका नटून थटून मुरडत होत्या.अगं बाई गजरा राहिलाच की म्हणून एकमेकीला आठवणीने सांगत होत्या.पुरूषमंडळी हवं नको बघत होते. घरात सगळीकडेच आनंदी आनंद होता. चौथ्या पिढीचं आगमन झालं होतं. कारण घरात नवीन बाळ जन्माला आलं होतं.या बाळामुळे प्रत्येकाचंच वरच्या पोस्ट वर प्रमोशन झालं होतं.कुणाचं आत्या म्हणून, कुणाचं मामी म्हणून, कुणाचं मावशी म्हणून.या सगळ्यांसाठी गोड अशी भाची मिळाली होती तर दोघी विहीणींचं आजी म्हणून प्रमोशन झालं होतं.. ..त्यातली एक आई आणि दुसरी सासू ज्या आजी झाल्या होत्या आणि दोघा व्याह्यांचं आजोबा म्हणून त्यातले एक बाबा आणि दुसरे सासरे होते.
या चौघा सिनियर सिटीझन्सला नात झाली होती.
आणि आमचं दोघांचं आई बाबा म्हणून प्रमोशन झालं होतं.
आम्हाला गोड अशी मुलगी झाली होती.
आमच्या कुटूंबामध्ये नवीन सदस्य आला होता आणि वंशवृक्षाला नवीन कोवळी फांदी .
ही सगळी तिच्याच बारशाची गडबड सुरु होती.अरे हो.. मुख्य सभासद विसरलेच की सांगायला.
आमच्या आजींना ..
आजीचं पणजी म्हणून प्रमोशन झालं होतं.पणजीला पणती झाली होती.
सोहळ्याचं आकर्षण पणजीच्या मांडीतील पणती..सगळीजण सोन्याची फुलं दोघींवर उधळत होती.पणजीला सोन्याची पणती मिळाली.
कुणी गोपाळ घ्या..कुणी गोविंद घ्या म्हणत बाळाचं बारसं साग्रसंगीत पार पडलं.
ही गोष्ट आठवण्याचं कारण म्हणजे माझी मुलगी बालकमंदीरात असताना हस्तकला वहीत फॅमिली ट्री बनवायला सांगितला होता टीचरने.उत्साहात आम्ही दोघींनी तो बनवला.
पायापासून फांदीपर्यंत कुटूंबातील सभासदांची नावं आणि फोटोंनी तो मोठा परिवाराचा वंशवृक्ष
(फॅमिली ट्री)सजवला.
माझ्या मुली भाग्यवान की त्यांना तीन पिढ्यांचा सहवास लाभला.
टीचरने कौतुक केलं. इतर मुलांनी पण तयार करून आणला होता.पण अगदी छोटासा.त्यामुळे ते हिरमुसले होते.माझ्या मुलीची एक मैत्रीण म्हणाली “आम्ही फक्त तीनच जण आहोत घरात. आई, बाबा आणि मी.पण मला तुझा फॅमिली ट्री जास्त आवडला. आम्ही व्हिडिओ काॅलवर बोलतो आजी आजोबांशी ते छोट्या गावामध्ये असतात ना.”तर दुसरी मैत्रीण सांगत होती “माझे आजी आजोबा परदेशात असतात काकां कडे.”
अनेक आजी आजोबा स्वतःसाठी नाही पण नातवांना बघता यावं, नातवांशी बोलता यावं म्हणून स्मार्टफोन शिकतायेत म्हातारपणी.
या निरागस मुलांना ऐकून आणि केविलवाण्या आजी आबांकडे पाहून हे म्हणताना खेद होतोय की “कधीकाळी घराचं अंगण हे त्या कुटूंबाचं आरसा असायचं.दारातील झोक्यावर बागडणारी नातवंडं,लेकीसुना,अन् प्राजक्त जणू सारी सुखं अंगणात सांडत बहरून आला असायचा.”आता ते अंगण ओस पडलंय जणू ..
फॅमिली ट्री सुकत आलाय असा भास होतोय हल्ली.
जसं “पर्यावरणासाठी झाडे वाचवा”असं म्हणतो तसं “कुटुंब व्यवस्था आणि संस्कृतीसाठी “फॅमिली ट्री वाचवा”. हाच संदेश कळकळीने द्यावा वाटतो.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जून२०२५
श्रध्दा सुदामे
नागपूर, रविवार, १ जून २०२५
Comments
Post a Comment