लोणच्याची बरणी

केशवसुतांनी म्हटलंय “ खादाड असे माझी भूक .चतकोराने न मला सुख.मनास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे.” मंडळी

ऋतूंप्रमाणे निसर्ग रंग बदलतो, बहरतो.निसर्गच काय आपलं स्वयंपाकघर देखील रंगीबेरंगी फळभाज्यांनी बहरत असतं.हिवाळा आणि उन्हाळा हे दोन ऋतू अतिशय आवडीचे आहेत माझे. का माहितेय? तुमचे देखील असणारच. बरोबर ओळखलंत कारण या दिवसांत खाद्यपदार्थांची रेलचेल असते म्हणून आणि त्यात खास मनसोक्त लोणची आणि पापड करता येतात म्हणून .आणि जेव्हा मी केलेल्या लोणच्याला दाद मिळते तेव्हा तर खूप भारी वाटतं.मूठभर मांस चढतं अंगावर. 

उन्हाळा म्हणजे कैरीचं लोणचं….मुरांबा, साखरांबा,पन्हं आणि हो कैरीची डाळ कशी विसरून चालेल!

आंब्याच्या झाडाला मोहोर यायला लागला की लगेच लोणच्याच्या बरण्या खरेदी करणं अशी तयारी दरवर्षीच…

ताज्या लाल मिरच्या बाजारातून आणायच्या, ऊन दाखवायचं , बाईकडून देठं खुडायची आणि लालचुटुक तिखट दळून आणायचं.केवढं हे बाळंतपण. हल्लीच्या मुलींना नाही कळायचं .हळकुंड दळणे..

हळदीचा तो सुवास..मी जात्यावर दळताना पाहिलंय आजीला आणि दळताना सुंदर ओव्या गाताना देखील.

आमच्या बालपणी परीक्षेचा सिझन आणि आईने वाळवणं करण्याचा सिझन एक यायचा.कुरडईचा गरम गरम चविष्ट चीक ,उडदाच्या पापडाच्या लाट्या काय लाजवाब लागायच्या. अभ्यास करता करता उन्हात वाळत घातलेली पापड , कुरडई राखण करणे हा साइड जाॅब असायचा.त्यात हळूचकन अर्धे वाळलेले जिन्नस स्वाहा करताना काय आनंद मिळायचा ..

बेडेकर लोणच्याचा मसाला, केप्र, सुरूची, प्रवीण लोणचे मसाले

ही मंडळी आपली नातेवाईक वाटू लागायची या दिवसात.

आमच्याकडे कैरी फोडण्याकरता स्पेशल भला मोठा अडकित्ता बनवून घेतलेला होता.

आणि आंबा ..फळांचा राजा त्याला कसं विसरून चालेल?

आमच्याकडे तीन चार जांभळाची, दोन तीन पेरूची, सीताफळाची आणि सहा सात आंब्याची झाडं होती. नोकर लोकं आंबा झाडावरून उतरवत, पाचट आणणे, आढी लावणे ही कामं त्यांना करताना आमची भावंडाची त्यात लुडबूड असे.प्रचंड ओरडा पडायचा पकडले गेलो तर कारण परीक्षा तोंडावर असायच्या.

त्यावेळी आम्हाला देवगडचा हापूस, रत्नागिरीतील हापूस, केशर असे आंब्याचं केलेलं वर्गीकरण समजायचं नाही.रायवळ आंब्याचा रसही अमृतासारखा लागायचा.

उन्हाळ्यातील आणखी एक मन थंडगार करणारी चीजवस्तू म्हणजे आइस्क्रीम. आइस्क्रीमची तर लूट असायची. सहज आठवलं आमची काॅलेजमधली एक मैत्रीण होती ती आम्ही आइस्क्रीम खात असताना तिला विचारल्यावर आवडत नाही म्हणाली आणि सगळ्यांनी अशा काही पध्दतीने तिच्याकडे पाहिलं जणू काय अर्थ आहे हिच्या जगण्याला? बिचारी आइस्क्रीमला मुकली होती आयुष्यात..

मनसोक्त खाणं जर खाल्लं नाही तर “अर्थ शून्य भासे मज हा कलह जीवनाचा”असं काहीतरी वाटायला लागतं की नाही? आवडेल ते मनसोक्त खाणं नार्मल माणूस असण्याचं लक्षण आहे असं मोठीमाणसं सांगून गेलेत.तेव्हा हिवाळ्यात सुध्दा डाएट प्लान चक्क झुगारून फक्त खवय्येगिरीचा आनंद उपभोगावा माणसाने .हिवाळ्यात भाज्यांची भरपूर रेलचेल असते. चुलीवरचं वांग्याचं भरीत,ठेचा आणि भाकरी म्हणजे त्रिवेणी संगम. त्या बरोबर हिवाळ्यात पुन्हा लोणचं.कोबी, गाजर या भाज्यांचं मिक्स लोणचं एका बरणीत तर दुसर्‍या बरणीत मिरच्यांचं लोणचं. तर तिसरीत लिंबाचं.उन्हात ठेवलेल्या त्या लोणच्याच्या बरण्या काय नेत्र सुख देतात. 

तिखटाप्रमाणे गोड खाणं हा देखील माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे .गाजर हलवा,दुधी भोपळ्याचा शिरा हे पदार्थ ती कसर भरून काढतात.फक्त खाणारा रसिक असला पाहिजे.

बोलत काय बसलेय मंडळी तुमच्याशी .. गडबडीत बरणीच्या तळाशी मीठ घालायला विसरत होते नेमकं… मैत्रिणींनो आज कैरीचं लोणचं घालतेय… यावेळी गूळ घालून थोडी बडीशेप असं मिसळून एक नवीन प्रयोग करणार आहे.खानदेशात करतात तसं. नेहमीचं घालतेच आहे दोन बरण्या..

 टीप- मेथ्या, मोहरीची डाळ आणि भरपूर तेल घालायला विसरू नका गं मैत्रिणींनो..

 शेवटी काय.. पु.ल.म्हणतात तसं बालपणीच्या “वदनी कवळ घेता” अवस्थेपासून “वदनी कवळी घेता” च्या परिस्थितीपर्यंत पानात पडेल ते खातानाचं सुख अनुभवत जगता आलं पाहिजे.


#सुरपाखरू #३०दिवसात३० #जून२०२५ 


श्रध्दा सुदामे

नागपूर, मंगळवार, १० जून २०२५

Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की