दरवळ

“गुड्डी” मधील जया भादुरीची आठवण यावी असं अनेक वेळा माझ्या बाबतीत योगायोगाने घडलं बालपणी.

सिनेमा सुरू होण्यापूर्वी थिएटर मध्ये ज्या इंडियन न्यूज , जाहिराती दाखवत त्याचं चित्रीकरण कारखान्याच्या परिसरात व्हायचं म्हणजे अपघात कसे टाळायचे किंवा आरोग्याची काळजीविषयक न्यूजवगैरे.तर एक शूटिंग मला आठवतं आमच्या घरीच त्या जाहिरातीतील युनिटमधील बायकामाणसं नऊवार लुगडी, शेतमजूर असं तयारी करून गावातून कारखान्यात शूटिंगसाठी रवाना करण्यात आल्या होत्या आणि मागोमाग आम्ही बच्चे कंपनी पण .मजा यायची त्यात भाग घेताना.

तसंच आमच्या इथे साखरकारखान्यात गणेशोत्सव म्हणजे एकापेक्षा एक दर्जेदार मराठी नाटकांची पंधरा दिवस लूट असे.याचं आता महत्त्व कळतंय मोठेपणी पण लहान असताना कोण हे कलाकार , किती मोठी माणसं काही जाणीव नव्हती. एक गमतीदार अनुभव सांगते.गणेशोत्सवातील त्यादिवशी पण रोजप्रमाणे नाटक होते. आम्ही जेवण करून छान गजरा वगैरे असं तयार होऊन जाऊन बसलो.मी नऊदहा वर्षांची असेन, थोड्यावेळात नाटक बघता बघता झोपून गेले.जाग आली तेव्हा मला आईबाबा उठवत होते.पटकन चल म्हणत रंगभूमीच्या मागे नेत म्हणाले अर्धा तासाचा छोटासा रोल आहे तुला करायचाय.फार डायलॉग नाहीचेत. मी झोपेत चालत होते , झोप मोडली म्हणून नाखूश होते. झालं असं होतं एक बालकलाकार बरं नसल्याने आली नव्हती वगैरे त्यामुळे कुणीतरी नाटकातील मंडळींना माझं नाव सुचवलं होतं. आणि आम्ही पोहोचलो .मेकअप, नऊवार लुगडं,दागिने,अंबाडा सगळे सोपस्कार झाले.नववधू करते तसा मामंजीना वाकून नमस्कार कसा करायचा त्याची प्रॅक्टीस, दोन तीन संवाद पाठांतर पण आटोपले आणि माझी एन्ट्री विंगेतून रंगभूमीवर झालीसुध्दा.अफाट जनसमुदाय पण“हे आमचे सातवे कुटूंब”म्हटल्यावर पहिल्याच माझ्या “इश्श”ला प्रचंड टाळ्या.आता मी ज्याच्या पत्नीची भूमिका केली तो होता लक्ष्मीकांत बेर्डे आणि मामंजी होते माननीय दत्ता भट.सगळीजण मोठे लोक आणि नाटक होते “पती गेले काठेवाडी”.

हे मला नंतर कळले तो लक्ष्मीकांत बेर्डे होता .त्यावेळी उदयोन्मुख कलाकार होता. सुवर्णसंधी मिळाली असं लोकं म्हणत होती पण मला अर्थ समजत नव्हता.ना स्पर्धा ना भीती काहीच वाटत नव्हतं.अजून एक कारण म्हणजे हे सगळेच नाटक कलावंत आमच्या शेजारी गेस्ट हाऊस मध्ये रहात दरवर्षीच.आमचा सी टाइप बंगला होता आणि डी टाइप बंगल्याचं गेस्ट हाऊस केलेलं होतं.आणि मध्ये तारेचं कंपाऊंड होतं.त्यामुळे बऱ्याच वेळा लपंडाव वगैरे आम्ही खेळण्यात कंपाऊंडमधून सरहद्द पार करून तिकडे लपत असू.रमेश देव आणि सीमा, आशा काळे यांचे “गहिरे रंग” नाटकाचे वेळी, तर अरूण जोगळेकर( सई परांजपेचे यजमान)अरविंद देशपांडे( सुलभा देशपांडेंचे यजमान)अमोल पालेकर,इत्यादीं तसेच शांता जोग यांचं “मंतरलेली चैत्र वेल” काशिनाथ घाणेकर यांचं “अश्रूंची झाली फुले” किंवा प्रभाकर पणशीकरांचं “रायगडाला जेव्हा जाग येते” आणि “ इथे ओशाळला मृत्यू” “ तो मी नव्हेच”किती नाटकांचे कलाकार शेजारी रहात..त्यांच्याशी हलक्याफुलक्या गप्पा होत.

एक गंमत आठवतेय आमची शाळा सकाळी अकरा वाजता असे.साधारण शाळेत जाण्यापूर्वी अर्धा तास वगैरे आम्ही मैत्रिणी खेळण्यासाठी जमायचो.कालचं राज्य ( डाव) ज्याच्यावर ती लपलेल्यांना शोधे.आम्ही तारेमधून या घरातून त्या घरातील बागेत, आवारात लपायचो. मी नेमकी गेस्ट हाऊस च्या बागेत लपले थोडासा धावण्याचा आवाज झाला माझ्या आणि नेमकं अरूण सरनाईक व्हरांड्यात पेपर वाचत बसले होते त्यांनी पाहिलं ते ओरडले “बाहेर ये.”आणि मी खुणेने “हळू बोला मी आऊट होईन”असं सांगत होते.

बाहेर ये आधी म्हटल्यावर मी त्यांच्याकडे गेले ,मी आऊट नाही झाले पाहिजे.ठीक म्हणाले.

मैत्रीणीला त्यांनी तिथून निघून जा इथे कोणी नाही म्हटल्यावर ती पळाली.थँक्यू थँक्यू मी म्हटलं.थोड्या गप्पा मारल्या अरूण सरनाईक यांच्याशी. मी कोण आहे माहित आहे का त्यांनी विचारल्यावर मी तुम्ही गाणं छान म्हणता असं म्हटल्यावर खूप हसले ते.मला “पप्पा सांगा कुणाचे ?पप्पा माझ्या मम्मीचे”गाणं फार आवडायचं त्यांचं. शाळेत जायचंय म्हणून पळाले मी नंतर.

अशा कलेला दैवत मानलेल्या माणसांबरोबर दहा वर्ष घालवताना व्यक्तिमत्त्व अनवधानाने बहरत गेलं आणि आठवणींचा दरवळ नेहमीच सुगंधित राहिला.


#सुरपाखरू #३०दिवसात३० #जून२०२५


श्रध्दा सुदामे

नागपूर, शनिवार, १४ जून २०२५

Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की