जरा विसावू या वळणावर 

आपल्याला वयाच्या पहिल्या वर्षापासून शिकवलेलं असतं की चालायचं कसं.ते मूल घरातील वडीलधार्यांचा हात घट्ट पकडून पडत धडपडत हळूहळू चालायला शिकतं.काही वर्षांनी शाळेत जातं. ससा आणि कासवाची गोष्ट ते मूल ऐकतं आणि मग धावायला शिकतं.अजून काही वर्षांनी स्पर्धांच्या रेसमध्ये धावायला लागतं.

खरंतर लहान मुलापासून माणूस बनलेला हा किंवा ही धावपळ त्यांच्या अंगवळणी पडते.मग ही धावपळ आवडायला लागते.जणू धावपळीचं व्यसन लागतं.ही धावपळ शरीराबरोबर मनाची असते. जन्माला आल्यापासून आयुष्याची टाइम लाइन आपण गाठत असतो. स्थैर्य नको वाटतं.शांत बसणं काहीही न करता, चिंतन करणं, स्वतःच्या आयुष्याचा मागोवा घेणं हा विचारही शिवत नाही आपल्या मनाला.मुंबईच्या लोकलट्रेनसारखा

धावत असतो प्रत्येक जण.

कारण “ थांबायचं असतं”त्याला कुणी शिकवलेलं नसतं लहानपणी.

 पण आपल्या प्रत्येकाला ज्याला त्यालाच “थांबायचं कुठे” हे ठरवावं लागतं.

आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की ब्रम्हचार्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यास हे मनुष्य जीवनशैलीचे चार टप्पे आहेत.यातील पहिल्या टप्प्यात अध्ययन मग दुसऱ्या टप्प्यात संसार प्रपंच आणि जबाबदारी पार पाडणे.संन्यास हा टप्पा बाद करूया.पण अगदी सगळं त्याग करून वनाकडे प्रस्थान करणे हा शब्दशः अर्थ न घेता वानप्रस्थाश्रमाचा आधुनिक मार्ग अवलंबता नक्कीच येईल.खरं तर भौतिक सुख, मोह, अर्थाजनाच्या मागे न लागता आयुष्यात थोडं विसावून आजूबाजूला बघता आलं पाहिजे.

सुधीर मोघेंनी लिहिलेल्या आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या गीताप्रमाणे 

“कसे कोठुनी येतो आपण

कसे नकळता जातो गुंतून

उगाच हसतो उगाच रूसतो

क्षणात आतुर क्षणात कातर

जरा विसावू या वळणावर या वळणावर..

भले बुरे जे घडून गेले

विसरून जाऊ सारे क्षणभर

कधी ऊन तर कधी सावली

कधी चांदणे कधी काहिली..

जरा विसावू या वळणावर या वळणावर…”

असं म्हणता यायला हवं. यासाठी समाधानी असणं यायला हवे. सेवानिवृत्तीचं आपण आपलं वय ठरवता आलं पाहिजे. थांबता आलं पाहिजे.सेवानिवृत्त होऊनही तब्येत,डोकं उत्तम असते,आर्थिक परिस्थिती चांगली असते. मग रिकामा वेळ सत्कारणी लागण्यासाठी Social Legacy

च्या जाणिवेतून समाजाप्रती काय योगदान करता येईल अशी भूमिका घेता यायला हवी.

 मग उदाहरणार्थ गरीबीमुळे शिक्षणाला मुकलेल्यांना 

हात देता येईल.त्यांना आधार देऊन चालायला शिकवता येईल इत्यादी.

स्वित्झर्लंड सारख्या अनेक ठिकाणी खूप जणांना तरूण वयात पैसा,गाडी, बंगला,प्राॅपर्टी,मान सन्मान मिळतो.त्यामुळे उरलेल्या आयुष्यात करायचे काय याने नैराश्य येते आणि ती लोकं Euthanasia किंवा “ mercy killing” किंवा इच्छामरणासाठी अपील करतात.तिथे इच्छामरणाचा कायदा आहे.तर काही वर्षांपूर्वीचा हृतिक रोशनचा “गुजारिश” सिनेमा या विषयावर होता.तो आजारी अंथरूणाला खिळलेला असतो.आपल्यादेशात तो कायदा नाही तरी देखभाल करण्यास अपत्य नसल्याने मुंबईच्या एका वयोवृद्ध दांपत्याने इच्छामरणासाठी याचिका टाकली होती.त्यांचे प्राॅब्लेम्स ऐकवत नव्हते.आपण अशा अनेक वृध्दांचं जगण्याचं कारण बनू शकतो. पर्यावरणविषयक मोहीम राबवू शकतो,मुलांमध्ये वाचनाची आवड जोपासण्यासाठी वाचनालये चालवू शकतो इत्यादी.

फक्त थोडं थांबायचं आहे धावताना.

स्पीड ब्रेकर लावायचा धावण्याच्या शर्यतीला.

आणि नवीन वळण द्यायचं आहे आयुष्याला.जिंकलेला कासव व्हायचं की हरलेला ससा आतातरी

समजायला हवं ना..

ज्याचा त्याचा विठ्ठल ज्याने त्याने शोधायला हवा ना...कुणाला तो गावतो देवळात तर कुणाला केविलवाण्या लेकराच्या डोळ्यांत …

एक विचारमंथन…


#सुरपाखरू #३०दिवसात३० #जून२०२५ 


श्रध्दा सुदामे 

नागपूर, बुधवार, ४ जून २०२५

Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की