मनाचा आरसा

आपल्यापैकी बहुतेक जण बहुतेक वेळा निर्णय घेताना किंवा आपलं मत मांडताना अथवा काय चूक काय बरोबर हे ठरवताना द्विधा मनःस्थितीत असतात.

शेक्सपियरच्या प्रसिद्ध नाटकातील हॅम्लेटचा डायलॉग “टू बी ऑर नाॅट टू बी” आहे.त्याप्रमाणे आपलं मन गोंधळून जातं.

फिजिक्समध्ये “प्रकाशा”ची दुहेरी गुणधर्माची थेअरी असा सिध्दांत आहे.तशीच माणसंदेखील दुहेरी स्वभावाची असतात. किंवा दुहेरी व्यक्तिमत्त्वाची असतात.काहीजण परिस्थिप्रमाणे भिन्न वागतात तर काही नेहमीच.किंवा द्वंद्व सुरु असतं दोन विचारांचं किंवा एका माणसाच्या दोन मनांचं असं म्हणूया हवंतर.

जसं मॅथ्समध्ये दोन व्हेरियेबल्स असतात X आणि Y तसं काहीसं आपल्या मनामध्ये दोन कप्पे असतात.जे आपल्याला दिसत नाहीत.एक X मन म्हणत असतं अमूक एक गोष्ट कर तर दुसरं Y मन म्हणतं नको करू.

आपण रोज आरसा पाहतो .त्यात चेहरा दिसतो.मन नाही.किती सोपं झालं असतं ना जर आपल्या प्रत्येकाला मनाचा आरसा दिसला असता तर…

हिंदी मूव्हीज मध्ये बर्‍याचदा हे दाखवतात त्या हिरो किंवा हिराॅइनची प्रतिमा हाऽ हाऽ हाऽ हास्य करत आरशात दिसत असते आणि बोलत असते त्या व्यक्तीशी.मागे म्यूझिक सुरु असतं ती तिला थांबवत असते 

वाईट वागण्यापासून . ही प्रतिमा मूळ व्यक्तिमत्त्वाच्या अगदी उलट असते. म्हणजे आरशातील प्रतिमा चांगली आहे आणि मूळ व्यक्ती 

वाईट असं .सगळ्यांनाच माहीत आहे हे त्याच व्यक्तीचं दुसरं मन असतं.हे केवळ सिनेमात दाखवतात.जे प्रतिमात्मक आहे.पण वास्तवात जर असा आरसा असता तर जिथे मन साफ दिसलं असतं…

तर बरंच काही शक्य झालं असतं.

आपण बहुतेक जण नवीन व्यक्तीला भेटतो पहिल्यांदा तेव्हा स्वभावातील वाईटपणा लपवतोच.

छान बोलतो.जसजशी ओळख वाढते संपर्क वाढत जातो आपल्याला स्वभावाचे विविध पैलू दिसू लागतात.कुणी अबोल आहे,कुणी कंजूष,कुणी स्वार्थी, कुणी खोटारडं ,कुणी हळव्या मनाचं असं.यात अर्थात वाईटच असाच अर्थ न घेता आपण चांगल्या गोष्टीही कळतात हे अभिप्रेत आहे.

प्रदर्शन किंवा मेला याठिकाणी आपल्यापैकी अनेक जण गेलेले असणार.किंवा म्युझियममध्ये सुध्दा.तिथे विविध प्रकारचे अंतर्वक्र, बहिर्वक्र आरसे असतात, ज्यात आपली विनोदी, वेडेवाकडी प्रतिबिंबं पाहून आपण लोटपोट हसतो .विशेषतः लहानपणी.फार मजा वाटते.पण या आरशांनी समजा माणसाचं मन दाखवलं असतं तर? जसं एका माध्यमातून दुसर्‍या माध्यमात जाताना प्रकाशाचा मार्ग माध्यमाच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सप्रमाणे बदलतो समजा तसा माणसाच्या स्वभाव वैशिष्ट्यांनुसार किंवा मनातील भावांनुसार आरशाचा रिफ्रॅक्टिव इंडेक्स बदलला असता तर…आरशातील प्रतिबिंबं वेडेवाकडी दिसू लागली असती.आपल्याला दरवेळी चित्र विचित्र प्रतिबिंब बघून खरंच हसू आलं असतं का? 

विचारमंथनसाठी….


#सुरपाखरू #३०दिवसात३० #जून२०२५


श्रध्दा सुदामे

नागपूर, मंगळवार, ३ जून २०२५

Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की