डिमेन्शिया - हरवलेली माणसं

 शेजारच्या बंगल्यात ती दोघंच रहात.मुलं परदेशी स्थायिक झाली होती.आमचा छान घरोबा होता.लहानपणी आम्हां मुलांना अंगाखांद्यावर खेळवलं होतं दोघांनी.नातवंडं, पोरं, सुना परदेशात असल्याने नेमकं आता उतारवयात दोघंच उरली होती एकमेकांसाठी.आईची,आमची एकतरी दिवसातून त्यांच्याकडे फेरी असायचीच.शांताआजी आणि आजोबा रोज दुपारी कलत्या ऊन्हाची झालर अंगावर घ्यायचे.जणू काही किरणांची दुलई पांघरायचे.खिडकीतून छान कोवळं ऊन आत यायचं.थंडीत पारा खाली गेला की

दुपारचं ऊनही कोवळं वाटायचं.

आजी फणीने केस विंचरत ,मग छानसा अंबाडा घालत ऊन्हात बसायच्या. त्यांचे निळसर झालेले डोळे ऊन्हात प्रिझमसारखे चमकायचे. निळ्या लोलकांतून सूर्यकिरणं परावर्तित 

होऊन निरागस हास्य आजींच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर दिसायचं.मी गोडाचा शिरा आईने केलेला आजी आजोबांकडे घेऊन फाटकाच्या आत शिरतच होते आणि “आजही काय तेजःपुंज दिसतेय स्वीटहार्ट”असं आजोबा आजीला थट्टेने म्हणाले.तुमचं आपलं काहीतरीच म्हणत आजी पण लाजली.जणू हे नार्मल होतं दोघांसाठी.

आजोबादेखील समोरच्या अंगणात आरामखुर्चीत रेलून ऊन अंगावर घेत वर्तमानपत्र वाचत बसले.पेपर वाचताना अर्धा तासाची डुलकी आजोबांची हमखास असायची. आपण झोपलो होतो छान हे त्यांना कधीच मान्य करायचं नसे.

मी मात्र शाॅक मध्ये गेले कारण चक्क आजोबा आजीला नावाने हाक न मारता स्वीटहार्ट म्हणाले होते.मी आश्चर्यचकित होऊन माझ्या घरी गेले.

आठ दिवसांनी शांता आजींचा वाढदिवस म्हणून आम्ही सगळेजण भेटायला गेलो शेजारी त्यांना.

“हॅपी बर्थ डे डिअर!” आजोबांनी सगळ्यांनाच धक्का दिला.किती रोमॅन्टिक या वयात! “इश्श,तुमचं आपलं काहीतरीच हं…हे काय वय आहे का आपलं?”एवढी काय लाजतेस? काॅलेजात नसलो तरी मित्र मैत्रीण आहोत एकमेकांचे.

माझ्या शेजारीच उभ्या असलेल्या शांता आजी पुटपुटत होत्या. “पोरं,सुनबाई ,नातवंडं काय म्हणतील पाहिलं तर…सारे म्हणतील आजी आजोबा वेडे झालेत”. मी म्हटलं पण यात काय वेडेपणाचं आहे? किती छान नातं आहे या वयातही तुमचं! एकदम फ्रेश! आमच्या जनरेशनसारखं!

आजोबांच्या ह्या अदावर तर मीही फिदा झाले होते.आम्ही सगळे घरी परत आलो.आईशी बोलता बोलता मी म्हटलं किती लकी आहेत ना शांता आजी ! आई नुसतेच म्हणाली कोण जाणे आणि उसासा टाकून निघून गेली.अरे किती विचित्र प्रतिक्रिया होती आईची..

मी दोन दिवसांनी सकाळी काॅलेजला निघाले होते.जरा वेळ होता म्हटलं आजी आजोबांना भेटून, थोडं बोलून पुढे जावं.

आत गेले तर आजी आजोबांचं संभाषण कानावर पडलं. “ अहो ऐका ना माझं .हेच तुमचं ,आपलं खरं घर आहे.मी तुमची पत्नी आहे.हे बघा हे फोटोज. ही आपलं मुलं, तो बघा मोठ्याचा मुलगा आर्यन आपला नातू आणि ही नात सायली.” आजोबा निर्विकार नजरेने बघत होते.आजींच्या डोळ्यांत पाणी दाटलेलं आणि अचानक मला पाहून त्या गोंधळल्या.मी खांद्यावर हात ठेवला आजींच्या.आम्ही बाहेर आलो , सोफ्यावर बसवलं त्यांना.पाणी पिऊन शांत बसल्या.मला म्हणाल्या “ गेली काही वर्ष झालीत हे सगळंच विसरलेत.मला वाटत होतं वयानुसार विस्मरण असेल.हरकत नाही.पण हल्ली मी त्यांची पत्नी आहे हे देखील विसरलेत गं हे.माझं नाव आठवत नाही.मैत्रीणच मानतात मला त्यांची.मी पण तेवढी वेळ निभावून नेते.पण रात्री बिछान्यावर दिसले नाहीत तर जीव कुठे गेले तर नाही निघून म्हणून कासावीस होतो गं.डिमेन्शिया की काय म्हणून डाॅक्टरांनी मागे तपासून सांगितलं होतं.तेव्हा यांना स्वतःचं घरच सापडत नव्हतं म्हणून बराचवेळ फिरले होते.पण आता?”

हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली.आजोबांना अल्झायमर? 

(डिमेन्शिया ,अल्झायमर सारखा नाजूक विषय मांडण्यासाठी शास्त्रीय आधार घेऊन लिहिलेली ही काल्पनिक कथा आहे.)

Black आणि Three Of Us सारख्या हिंदी सिनेमांतून हा विषय छान मांडला आहे.


#सुरपाखरू #३०दिवसात३० #जून२०२५


श्रध्दा सुदामे

नागपूर, मंगळवार, १७ जून २०२५

Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की