सवाई गंधर्व
एक आठवण
फर्ग्युसनलाच असताना केलेल्या अनेक दिव्य साहसांपैकी हे एक.
दरवर्षीच डिसेंबर जानेवारीच्या थंडीचा कहर असताना सवाई गंधर्व महोत्सव ही दहा दिवसांची पुणेकरांसाठी संगीतमय मेजवानीच असते.त्यामुळे आम्ही त्या मौसमात न्हाऊन घ्यायचो.
रोज रात्री आठ ते पहाटे सहा वाजेपर्यंत दिग्गज घराण्यातील शास्त्रीय गायक वेगवेगळे राग तल्लीन होऊन गात.अहाहा काय समा चढायचा.
आम्ही शिकत असल्याने घरून जे काही आम्हाला मर्यादित पैसे मिळत त्यात आम्ही खर्च adjust करत असू.त्यामुळे सवाई गंधर्वची महागडी तिकीटे आणि पासेस आमच्या बसकी बात नही थी…
लेकीन फेस्टिवल तो देखनाही था..
अब क्या करे असं आम्ही विचारात असताना एक खुशखबर कानावर उडत उडत आली.ती अशी की बहुतेक अरसिक लोकं भल्यापहाटे दोन वाजताच अर्ध्या कार्यक्रमातून निघून जातात त्यामुळे बसायला अगदी समोरची बैठक सहज मिळते.आम्ही लगेच रोज पहाटेचं आमचं ध्येय साध्य करण्याची योजना आखली.आमच्याकडे वाहनं नव्हती.त्यामुळे आम्ही rent ने सायकली करायच्या.साधारण पाच सहा किलोमीटर अंतर कापायचे म्हणजे साडेतीन वाजताच होस्टेलवरून निघावे लागणार होते. कारण त्या आधी लवकर शक्य नव्हते.तसं आम्ही दर रविवारी सायकलीने पर्वतीला जायचो त्यामुळे सवय होती. होस्टेलची सुपरिडेंट आमच्याच वयाची शिकणारी मुलगी होती.तिलाही संगीतात रस होता.त्यामुळे तीही या मिशन इंपाॅसिबल मध्ये आमच्यात सामील झाली.भल्या पहाटे भर थंडीत तीन वाजता उठून आम्ही गरमागरम चहा घेऊन आमची टोळी सायकलिंग करत निघे.खूप भीती वाटायची, कारण रस्त्यावर शुकशुकाट असे,तेवढी कुत्री सोडलीतर.लकडीपूल ओलांडता ओलांडता थंडी कुठल्या कुठे पळालेली असे.आम्ही आमच्या ध्येयाने प्रेरित आगेकूच करत पोहोचायचो.अंतर्गत सूत्रांकडून माहितीनुसार आम्ही जागा हेरायचो आणि पूर्ण आत्मविश्वासाने आसनस्थ व्हायचो अगदी व्यासपीठासमोर.
आता आठवलं की हसू येतं किती वेडे होतो ना आपण..
पद्मविभूषण गिरिजादेवींची ठुमरी, पं.जितेंद्र अभिषेकींचं “ काटा रूते कुणाला”ऐकताना अंगावर रोमांच येत.त्यादिवशी गाताना अभिषेकींच्या नाकातून रक्त वाहू लागले.थोडंसं काय ते थांबले अन् गायला पुन्हा सुरुवात केली पण मैफीलीत खंड नाही पडू दिला.
अभंग गावेत तर ते फक्त पंडीत भीमसेन जोशींनी.”माझे माहेर पंढरी “ ऐकताना कधी डोळ्यांवाटे अश्रू वहायला लागत कळत नसे आणि तल्लीन होऊन भान हरपून श्रोते भक्तीरसात चिंब न्हाऊन निघत.
रात्रीच्या मैफिलीची सांगता पहाटे तांबडं फुटताना सकाळी सकाळी करावी ती भीमसेन जोशींच्या भैरवीने.
तो मान असे त्यांचा.शेवटच्या दिवशी तर सकाळी नऊवाजेपर्यंत भीमसेन जोशींची भैरवी अशी काही रंगायची की..आलाप, ताना याने संपूर्ण सवाई गंधर्व महोत्सवाचा परिसरात आसमंतातून लहरी उठत.
आज ही तिघंजण आपल्यात नाहीत पण त्यांच्या स्वरांनी समृद्ध
केलेल्या अमृतकुंभातील काही थेंब माझ्यावर पडले .सरतेशेवटी एवढंच म्हणेन….
“ संधीचे जमले सुवर्ण करणे... त्या परप्रकाशामुळे
काहीवेळ जगामधे झळकलो, हेही नसे थोडके…”
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जून२०२५
श्रध्दा सुदामे
नागपूर, सोमवार, ९ जून २०२५

Comments
Post a Comment