बालिका वधू

 टेलिव्हिजनच्या कलर्स वाहिनीवर यायची ती मालिका समजला असाल तर नाही. ही नायिका मालिके मधील अजिबात नाही.. तर ही आहे खरी तुमच्या माझ्यासारखीच पण बालपण हरवलेली मला भेटलेली बालिकावधू.

साधारण इयत्ता पाचवीत वगैरे मी असेन. दिवाळीच्या सुट्ट्या सुरु होत्या शाळेला.

साखरकारखान्यात नवीन गळीतहंगाम सुरु झाला होता. रोजच्या चार चार शिफ्ट असत कामगारांना. पहाटे ४ ते दुपार १२,१२ते ८, ८ ते ४ आणि जनरल शिफ्ट ७•३० ते ५•३०. प्रत्येक शिफ्ट बदलताना तीन भोंगे होत.

सुट्टया असल्यामुळेच की काय त्यादिवशी पहाटेच्या पहिल्या भोंग्याला नेमकी जाग आली. बंगल्याच्या मागच्या व्हरांड्यात फेऱ्या मारणं सुरू होतं माझं आणि कारखान्याच्या बाजूने धूर येताना मला दिसला. सुरुवातीला वाटलं चिमणीचा धूर असेल. पण लक्षात आलं धूर वाढत चालला आहे. तेवढ्यात बाबांना जनरल ऑफीसमधून फोन आला होता कारखान्यात मोठी आग लागली होती आणि आजूबाजूलाच वसाहतीतील घरापर्यंत ती आग झपाट्याने पोहचत होती. बाबा वेगाने साखरकारखान्यात गेले. आम्ही सगळेच खूप घाबरलो होतो. आमच्या साठी नव्हे पण ज्यांची घरे पाचटांपासून बनलेल्या चाळीत होती त्यांच्यासाठी.

थोड्यावेळात काय घडले ते असे होते ..अनेक कामगारांचे संसार आगीत जळून भस्मसात झाले होते. नशीबाने जीवीतहानी काही नव्हती. काही तासांनी बाबा परत आले आणि पाठोपाठ दोन कुटुंबं.

आमच्या बंगल्यातील गॅरेजमध्ये एका कुटूंबाला राहण्याकरता आणि दुसर्‍या कुटूंबाला आउटहाऊस मध्ये जागा दिली गेली. त्यांच्याकडे मोजकेच सामान उरले होते ते घेऊन सारे रडक्या उदास चेहर्‍याने बसले होते ते बघवत नव्हते. एक मराठी कुटूंब होतं त्यांची मुलगी माझ्याच एवढी होती आणि दुसरं उत्तर प्रदेशातून आलेलं हिंदी भाषिक. 

मला खूपच वाईट वाटत होतं. तो दिवस एकदाचा कसाबसा गेला. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर व्हरांड्यात आल्यावर परत नजर त्या आउटहाऊस मधील कुटुंबावर गेली. ”ती” पहिल्यांदाच दिसली मला.

मी पाहिलं तिने मला हसून ओळख दाखवली. मी विचारलं “नाम क्या है तुम्हारा?” तिने उत्तर दिलं “कमला”

कमला लहान होती माझ्यापेक्षा.

आठनऊ वर्षांची असावी. तिने डोक्यावर ओढणी, हातात बांगड्या भांगेत सिंदूर भरला होता, पायात जोडवे, पैंजण. हे माझ्यासाठी नवीन होतं.

हे यूपीतून आलेले कामगार कुटुंब आग लागल्याने काही महिने तरी आमच्या इथेच राहणार होतं.मला तसं छान वाटत होतं कारण शाळेला सुट्टया होत्या आणि मला खेळायला कमला मिळाली होती. लंगडी, ठिक्कर, भातुकली अशा आमच्या खेळांत कमला पण भाग घेत होती. राहून राहून एक प्रश्न पडायचा कमला अशी का राहते? तिच्या आईला मी विचारल्यावर कळलं “उसका ब्याह हुआ है बेटा. कमला अब शादीशुदा है ना इसलिए”

मी कमलापेक्षा दोनतीन वर्षांनीच मोठी असल्याने मला या गोष्टीचं गांभीर्य त्यावेळी तरी कळालं नाही. पण गंमतच वाटली. मी कमलाला विचारलं म्हणजे तुझा खराखुरा नवरा आहे? तर ती लाजली आणि हो म्हणाली. कारण आम्ही त्यावेळी बाहुला बाहुलीचं लग्न असं खेळात करायचो त्या वयात. आणि कमलाचं खरं लग्न झालं होतं लहानपणी. माझ्या अनेक प्रश्नांवर उत्तर मिळाली नाहीत. मी विचारलं कुठे आहे नवरा? तर तिची आई सांगत होती उत्तर प्रदेशात गाव आहे त्याचं. तिकडे कमलाची सासरची लोकं आणि नवरा असतो.

”तीनचार साल तक कमला मायके रहेगी. फिर लेके जायेंगे उसे अपने घरवाले.” मला एवढाच आनंद होता की कमला माझी मैत्रीण निदान तीनचार वर्ष इथेच राहणार. कमला अल्लड मुलगी होती पण बालपणी आलेल्या लग्नाच्या ओझ्याने मधूनच शांत बसत असे. अकाली प्रौढत्व आलं होतं कमलाला.

माझ्या सुट्ट्या संपून परत शाळा सुरू झाली. आता दिवसभर कमला काय करत असेल हा विचार असायचा. संध्याकाळी माझी वाट बघत दारात उभी असायची ती. आल्यावर मी अभ्यास, पाढे तिला शिकवायची. पण हळूहळू माझा अभ्यास वाढत गेला ..परीक्षांवर परीक्षा ..दिवस सरत गेले… कमलाचा मी घट्ट धरलेला हात सुटला.. मी पुढच्या वर्गात आणि कमला मात्र अजूनही दारात…  

अजूनही माझे प्रश्न अनुत्तरित आहेत ..कमलाचंआयुष्य चारचौघींसारखंच असेल आता? तिचा नवरा तिला घेऊन गेला असेल ना? ती पुढे शाळा शिकली असेल का? ती खुश असेल ना?

नेहमीच दिसत असते माझी वाट पहात असलेली बालिकावधूच्या वेषातील कमला….


#सुरपाखरू #३०दिवसात३० #जून२०२५


श्रध्दा सुदामे

नागपूर, बुधवार, ११ जून २०२५

Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की