गमी 

राजास जी महाली 

सौख्ये कधी मिळाली

ती सर्व प्राप्त झाली

या झोपडीत माझ्या

येता तरी सुखे या

जाता तरी सुखे जा

कोणावरही ना बोजा

या झोपडीत माझ्या

ही कविता आपल्याला शाळेत पाठ्यपुस्तकात होती.त्याचा अर्थ मराठीच्या बाईंपेक्षा गंगूबाईने मला शिकवला.

माझ्या लहानपणापासून गमी अर्थात गंगूबाई आमच्याकडे होती. “गमी”हे आम्ही तिला दिलेलं नाव.जवळपास पंधरावर्ष ती आमच्याकडे काम करत होती.भांडीधुणी वगैरे.पण गंगूबाई आमची मोलकरीण होती हे म्हणताना जीभ अडखळते.

कारण ती,तिची मुलगी आमच्या घरातील एक सभासदच होती जणू काय.तिचा पगार तो काय केवळ पंधरा रुपये महिना होता त्यावेळी.पण ती आनंदी आणि समाधानी होती.एका पायाने लंगडी असलेली गंगूबाई नऊवार, खणाची चोळी , कमरेला खणाचीच शिवलेली चंची ,कपाळावर लाल कुंकू अशी असायची. गंगूबाईच्या चंचीत वेगवेगळ्या कप्प्यात दडलेली असायची सुपारीची खांडं , तपकीरीची डबी. तिची मुलगी सुशीला इतर मैत्रींणींसारखीच माझी मैत्रीण होती.दिवाळीला बक्षीस ते काय केवळ एक खणाचं कापड. जास्त काही दिलं तर नाही म्हणायची.अतिशय स्वाभिमानी होती.नवरा दारूडा म्हणून सोडून दिलं होतं तिने आणि आपल्या मुलांना घेऊन एकटीच रहायची झोपडीत.कधीही नशीबाला , गरीबीला दोष देत रडत बसणं नाही.

वर्षातून एकदा ती आम्हाला तिच्या घरी ( झोपडीत) आमंत्रण द्यायची. खास कांदाभजी खायला.आणि आम्ही लहान मुलं त्यादिवसाची वाट पहात असायचो.तिची झोपडी म्हणजे आमच्यासाठी महाल होता आमच्यासाठी सर्व सुखं असलेला.गंगूबाईच्या झोपडीत खाली वाकून जावं लागे इतकी छोटीशी झोपडी.

अंधारलेली, जेमतेम आम्ही तिघंजण बसू शकू एवढीशी जागा.तिच्याकडे बकरी पाळलेली होती, त्या बकरीच्या दुधाचा चहा पिताना अमृत वाटे आणि अप्रुपही. लहानपणी गांधीजी बकरीच्या दुधाचा चहा पीत असं इतिहासात वाचलेलं असायचं त्यामुळे अंगात उगीचच स्फुरण चढे.

आजच्या जगात मोलकरीण हा इतका ज्वलंत चर्चेचा आणि मागणीचा विषय झालाय की परवा पहिलीत शिकणारी छोटीशी मुलगी मोठी होऊन काय व्हायचंय विचारल्यावर मला चक्क “ मेड विथ अट्राक्टिव पॅकेज ” असं म्हणाली .मी आश्चर्यचकित. 

व्यावसायिक उद्देश ठेवून काम करणाऱ्या या मोलकरीणी एकीकडे आणि आमची गंगूबाई एकीकडे. नारळाच्या साली ही तिची घासणी आणि चुलीतील राख घेऊन काय चकाचक पितळेची भांडी घासायची! तांब्याची, चांदीची देवपूजेची भांडीसुध्दा चिंच लावून इतक्या श्रध्देने घासायची , जणू देवासाठी सेवा आणि भक्ती अर्पण करायची गंगूबाई.स्वतःकडे पैसे नसून जीवाला जीव देणारी ही माणसं ईश्वराचा अंश वाटतात. आमची आजारपणं असू दे किंवा हळदीकुंकू व इतर मंगलकार्य गंगूबाईची लगबग असे.आईला खूप मदत होई तिची.

काही वर्षांपूर्वी बाबांची बायपास झाल्यानंतर ही लंगडी गंगूबाई दोन बस बदलून पुण्यात भेटायला येते.त्यावेळी तिच्या 

डोक्यावरचं केसांचं टोपलं पांढरंशुभ्र झालेलं होतं, डोळे खोबणीत दिसेनासे झाले होते आणि दात पडून तोंडाचं बोळकं.अंगावरची कातडी सुरकुतलेली पण काळीज मात्र ओलाव्याने अतोनात भरलं होतं.

आज गंगूबाई हयात नाही पण तिने माझ्या मनात एक कोपरा कायमचा व्यापलाय ज्याचं दार उघडून डोकावलं असता भूतकाळातील त्या आठवणी पुन्हा ताज्या होतात अन् अश्रूचा थेंब गालावरुन नकळत निसटून जातो.


#सुरपाखरू #३०दिवसात३० #जून२०२५ 


श्रध्दा सुदामे

नागपूर, शनिवार, ७ जून २०२५

Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की