सावली
वयाच्या या टप्प्यात परत एकदा स्वतःला नवीन भेटताना…. सिंहावलोकन करताना ,फिरुन मागे वळून पाहताना…ओळख माझीच सांगताना…
काय सांगू? प्रश्न पडलाय मनास…
दरवर्षी स्वतःच्या वाढदिवशी नवीन काय केले आपण किंवा value addition काय केली विविध स्तरांवर असं आत्मपरीक्षण करण्याची एक सवय किंवा नियम आहे माझा.काय चुका केल्या, नवीन काय शिकलो वगैरे.कारण व्यक्तिमत्त्व विकास हा कधीच पूर्ण होत नसतो .ही एक process आहे खरं तर.या प्रोसेस मध्ये
किती ही रूपं एकाच व्यक्तीची….
मुलगी, बहीण, मैत्रीण, विद्यार्थिनी, टीचर, लेक्चरर. अशा विविध भूमिका रंगवताना आयुष्य ही एक रंगभूमी आहे तर कधी एक व्यासपीठ आहे ह्याची जाणीव होते.आयुष्याचा चित्रपट कसा आपणच दिग्दर्शित करतो याचं कोडं पडतं.
खरी भूमिका तर आयुष्याच्या नवीन वळणावर बदलते.अगदी बरोबर ओळखलंत ..लग्नानंतर.आतापर्यंत फक्त नाव बदलत होतं पण विवाह बंधनात आडनावाबरोबर पुन्हा नवीन भूमिका…..घर बदलतं, शहर बदलतं, प्रथा, रिती , भाषा, माणसं सगळंच बदलतं.मैत्रीणी ही नवीन बनतात.बायको,सून,वहिनी हे रोल पार पाडताना कधीतरी तारेवरची कसरत होते प्रत्येकीची.
इथंपर्यंत ठीक होतं रोल बदलतं होते.पण एकाच जन्मात दुसऱ्यांदा जन्मलेली व्यक्ती…कशी वाटते कल्पना! प्रत्येक स्त्री दुसऱ्यांदा जन्म अनुभवते.येस …आई होते तेव्हा….आपल्या वेदना , कष्ट, यातना सहन करते जेव्हा. आपलाच जणू एक अवयव नऊ महिन्यांनी स्वतंत्र होतो,त्याचा जन्म होतो आणि "ती" चा पुनर्जन्म होतो.किंवा साक्षात “ती” ची सावलीच प्रकटते.
"आई" ही माझी सगळ्यात आवडती भूमिका….कुठल्याही स्त्रीला पूर्णत्वाकडे नेणारी “आई” ची भूमिका साकारताना कधी भावनिक ओढाताण तर कधी कठोर तटस्थ शिस्तबद्ध अनुशासन यांची जुगलबंदी होते.आपण बरोबर आहोत ना? याचा feedback कोण देणार? आपण आपल्या मुलांवर केलेल्या संस्कारांचा review कसा करायचा? असा मनात गोंधळ नेहमी सुरु असतो . तर आज परत २ जून आलाय, आत्मपरीक्षण सुरु झालंय.आई सांग ना..
वाढदिवसानिमित्त छान भेट काय असू शकते?हा प्रश्न जुई गेले काही दिवस विचारत होती आणि आई मी तर तुला काहीच गिफ्ट दिलं नाही गं असं म्हणून हिरमुसून जात होती आज सकाळी पुन्हा ती मिश्किलपणे विचारत होती “ आज काय आहे स्पेशल? दोन जूनला यावर्षी बरंच काही होणार आहे.” तिच्या चेहऱ्यावर हसू होतं.जरावेळाने लक्षात आले,अरे ही बोलतेय ते आपल्या वाढदिवसाचं नसून तिचा रिझल्ट लागला होता. काॅलेजमध्ये बारावीत पहिला क्रमांक आला होता आणि मेरीट आली म्हणून सत्कारसोहळा आहे आणि तोही दोन जूनला सकाळी अकरा वाजता. तिथे तिच्याबरोबर आई म्हणून आपली पण आज पाठ थोपटली जाणार आहे. तिला संस्कार देताना आपण आयुष्याच्या व्यासपीठावर खरे उतरलो याचा अभिमान वाटतोय.त्याची पोचपावती नेमकी आज मिळावी यासारखी छान feelingकुठलं नाहीये.
सोहळा थोड्यावेळापूर्वी पार पडलाय.पालक म्हणून माझ्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय.
मी म्हणत होते,“वाढदिवसानिमित्त जे गिफ्ट तू मला आज दिलं आहेस ना त्याची सर कुठल्याही महागड्या गिफ्टला येणार नाही कधीच.थॅंक्यू बेटा..”
मी माझं आत्मपरीक्षण केलं होतं.
आणि खूप खुश होते.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जून२०२५
श्रध्दा सुदामे
नागपूर, सोमवार, २ जून २०२५
Comments
Post a Comment