चंद्रभागेच्या तीरी
पुराणांपासून बघितलं तर स्त्री रूपवान असेल, समाजातील खालच्या स्तरातील असेल तर तिच्याविषयी उलटसुलट चर्चांना नेहमीच उधाण येते.हे अगदी १५व्या शतकापासून ते आजतागायत चालत आलंय.कधी भवतालची परिस्थिती,कधी कौटुंबिक परिस्थिती तर कधी तिचे निर्णय या चर्चांना कारणीभूत ठरतात. आज आषाढीनिमित्त अशाच एका साध्वी स्त्रीचं स्मरण करूया. तिला खरं तर अख्खा महाराष्ट्र ओळखतो.आपल्या भक्तीरूपी शक्तीने आपल्यावरील संकट तिने कसे थोपवले?कोण आहे ती देवत्वास पोहोचलेली स्त्री? आषाढीएकादशीनिमित्त वारकरी संप्रदाय पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर ,भक्तीरसात मग्न होऊन दाखल झालाय. अभंग, भजनं यांचा पाऊस पडतोय. या अभंगांची रचयती दिव्य, तेजःपुंज स्त्री ..जिचं नाव आहे कान्होपात्रा ..हो तिच वर उल्लेखलेली संत कान्होपात्रा. तिचं स्मरण तर करायलाच हवं ना!कान्होपात्राचा जन्म पंढरपुरातील सोलापूर जिल्ह्य़ातील मंगळवेढा इथे शामा नावाच्या गणिकेच्या पोटी झाला.जसजशी कान्होपात्रा लहानाची मोठी होऊ लागली तिचं रूप हा चर्चेचा विषय होऊ लागला.ऐषोआरामी आणि सुखोपभोगी वातावरणात कान्होपात्रा वाढत होती. तिच्या महालात सेवेस दासी होत्या.लहानपणीच पायात चाळ बांधले गेले असले तरी कान्होपात्राच्या हृदयात विठ्ठल भक्तीचा अंकुर फुटत होता.कान्होपात्रा अतिशय बुद्धिमान होती.नृत्य आणि गायन यात निपुण होती.तिची किर्ती सर्व दूर पसरत होती.तिच्या आईस वाटे कान्होपात्राने राजनर्तकी व्हावे पण कान्होपात्राला मात्र उपवर बुद्धिमान पुरुषाबरोबर विवाह करायचा होता.जे अर्थातच अशक्य होते.त्यामुळे ती परमार्थ,विठ्ठल भक्ती यांत रमू लागली.कर्नाटकातील बिदरच्या बादशाहच्या दरबारात नर्तकी म्हणून तिला बोलावणे येऊ लागले.गावचा नगरप्रमुखही तिच्या सौंदर्यात वेडा झाला होता.असं असताना सगळ्यांतून अलिप्त कान्होपात्रास आषाढी एकादशीची वारी खुणावू लागली.तिची हौसा नावाची दासी विठ्ठल भक्त होती.दोघी रोज वारीला जाणाऱ्या संप्रदाय बघून विठूरायास भेटण्यास आतुर होत होत्या.आणि एकेदिवशी कान्होपात्रा दासीच्या वेषात वारकरीपंथाबरोबर मध्यरात्रीच्या अंधारातून पंढरपुरात दाखल झाली.आणि विठ्ठल चरणाशी एकाग्र झाली. दासी हौसा व ती झोपडीत राहून पांडुरंगाची सेवा करू लागली. परमेश्वराजवळ व्याकुळ भावाने विनवणी करू लागली.
“मज अधिकार नाही।भेटी देई विठाबाई॥
ठाव देई चरणापाशी।तुझी कान्होपात्रा दासी॥”
कान्होपात्राने रचलेले अभंग लोक गात.तिचा स्वर आणि रचना दूर पसरू लागल्या. यामुळे नेमके नको तेच विपरीत घडले आणि त्या दुष्ट नगरप्रमुखाने बिदरच्या बादशहास इत्थंभूत निरोप पोहोचवला.दुसरे दिवशी बादशाहचे सैनिक पंढरपुरात पोहोचले.
अशावेळेस पांडुरंगाच्या चरणांशी विलीन होऊन तुच माझा रक्षण कर्ता आहेस ईश्वरा.या दुष्टांपासून मला वाचव.असं म्हणून विठ्ठलाच्या चरणांवर नतमस्तक कान्होपात्रा अभंगातून परमेश्वराला विनवते..
नको देवराया अंत आता पाहू
प्राण हा सर्वथा जाऊ पाहे॥
हरिणी पाडस व्याघ्रे धरियेले
मज लागली जाहले तैसे देवा॥
काय चमत्कार! बघता बघता चंद्रभागेला पूर आला.बादशाहचे सैनिक त्यात वाहून गेले.पांडुरंग साध्वीसाठी धावून आला.आपल्या भक्तीणीची व्यथा ऐकून विठ्ठलाने कान्होपात्रास कायमस्वरूपी आश्रय दिला.तिने प्राणत्याग केल्यानंतर कान्होपात्राची समाधी विठ्ठल मंदिरातच बांधली गेली आहे.तिथे एक वृक्ष जन्मास आला आणि कान्होपात्रा आपल्या सावलीतून आणि अभंगातून अमर जाहली.
“जीवीचे जिवलगे माझे कृष्णाई कान्हाई – संत कान्होपात्रा अभंग”
©️®️श्रध्दा सुदामे

Comments
Post a Comment