कथा क्रमांक १. रात्र
तिला फाटकाचा आवाज आल्यासारखं वाटलं.कोण आलं असेल एवढ्या रात्री? किती वाजले म्हणून तिने घड्याळात पाहिले मध्यरात्रीचे दोन वाजले होते.नवरा म्हणाला झोप गं.शेजारी आलं असेल कोणी .उशीराच्या फ्लाईटने असेल. ह्म्म! असं म्हणून ती झोपली खरी पण मन अस्वस्थ होतं.दोन तासाने असावं साधारण कुणीतरी जोरजोरात परत फाटक वाजवत होतं.आता मात्र ती उठलीच.दिवा लावला.नवराही उठला.खाली जाऊन दरवाजा उघडून अंगणात येऊन बघताहेत तर बाबा फाटकाच्या बाहेरच्या बाजूस घराबाहेर होते.ती दोघंही चक्रावून असं कसं झालं म्हणाले. फाटकाचं कुलूप काढत बाबांना आत घेतलं.दोघांनी बाबांना आत घरात आणलं.नेमकं काय झालं, तुम्ही घराबाहेर गेटवरून उडी मारून का गेलात बाबा? मधुरा रडवेली होऊन त्र्याण्णव वर्षांच्या वडीलांना विचारत होती.वडीलांना काहीच आठवत नव्हते.मधुराची आई पंधरावर्षांपूर्वीच गेली होती.भावाचा डिवोर्स झाला होता.तो एकटा लक्ष देत होता दिवसा.पण या घटनेनंतर दुसर्या दिवशीपासून रात्रीचा ब्युरोमधून माणूस येऊ लागला.तो रात्रभर झोपे. दुसर्या दिवशी आंघोळ घालून मग जाई.पण मधुराचे वडील त्याला जुमानत नव्हते.दिवस रात्र वेळा त्यांना समजेनाशा झाल्या होत्या. मधुरा काॅलेजमध्ये प्रोफेसर होती.
मुलीचे लग्न वगैरे जबाबदारी पार पडली होती.पण संध्याकाळी आलं घरी की स्वयंपाक आणि वडीलांजवळ बसणं.हे रोजचंच काम झालं होतं. परवा तिला सहज फोन केला तर काॅलेजमधून येते म्हणाली तुझ्याकडे. आली खूप गप्पा मारल्या मधुराने.कुठेतरी पुण्याबाहेर दोन दिवस आपण मैत्रिणी जाऊ असं म्हणाली.काहीतरी खटकत होतं माझ्या मनाला.मधुराचं वागणं.वरकरणी ठीक वाटणारी ती आतून कोसळली होती.वर्तमानापासून दूर पळत होती.आठ वाजून गेले तरी तिचा निघायचा विचार दिसेना तेव्हा हळूच मी म्हटलं बाबांजवळ कोण आहे तर येईल म्हणे ब्युरोचा माणूस.तसंही ते मला मुलगी म्हणून ओळखतात कुठे? मी कोण हे त्यांना कळत नाही.कधी बहीण म्हणतात असं काही तरी. डिमेन्शिया वाढत चाललाय त्यांचा.करण्याकरता उपाय काहीच नाही.वृध्दत्वात आलेलं दुखणं.शारिरीक नाही तर मानसिक. मला ऐकून खूपच वाईट वाटलं .धस्सं झालं काळजात. मी मधुराचा हात धरला पण मधुरा निर्विकार होती. त्या रात्रीपासून तिच्या संवेदना जणू गोठल्या होत्या कारण मधुराचे वडील हरवले होते रात्रीच्या अज्ञात कृष्णविवरात.
©️ श्रद्धा (इरावती) सुदामे
मोबाईल ८८३०७८४१०३
१ जानेवारी २०२६

खूपच सुंदर. अप्रतिम चटका लावणारी प्रत्यक्षात होणारी घटना.
ReplyDeleteतुझ प्रेसेंटेशन अकल्पनीय खूपच सन्वेंदनेशील.