कथा क्रमांक -५ ती
ती
शाळेतून आज बर्याच दिवसांनी
मीनल वेळेत निघाली होती.
बायोमेट्रिक पंच करून कार पार्किंग कडे वळणार तितक्यात तिला आठवी “अ”मधील प्रिया अजूनही शाळेच्या ग्राउंडवर रेंगाळलेली दिसली.मीनलने प्रियाला सायकल नाही आणली का आज? मी सोडून का घरी विचारताच प्रिया नको म्हणाली.
मैत्रीण येतेय तिची वाट बघतेय असं सांगितल्यावर मीनल कार काढून निघाली खरी.पण तिच्या डोक्यातून प्रियाचा विचार काही केल्या जाईना.आणि मग एकदम मीनलला त्यादिवशीचा सायन्सचा पिरियड आठवला.त्यादिवशी घडलं असं की…
ती सायन्स टीचर असल्याने तिने नेहमीप्रमाणेच ओ.एच.पी.वर स्लाइड्स दाखवत शिकवायला सुरुवात केली.कधी कधी स्मार्ट बोर्डावर शक्य नसेल पुरेशी माहिती व स्पष्टीकरण तर प्रोजेक्टर वापरावा लागे.आजचा टाॅपीक होता “लाइफ प्रोसेसेस इन ह्यूमन बिइंग - 1) रिप्राॅडक्टशन
स्लाईड वर गुणसूत्रे,पुरूष स्त्री अवयवांचे जीवशास्त्रीय विश्लेषण सुरू होते.वर्गातील मुले मुलींकडे बघून हसत होती. कमेंट्स पास करत होती.मुली काहीशा अवघडून लेक्चर ऐकत होत्या.त्यातील एका ग्रुपकडे मीनलचं लक्ष सतत जात होतं. पण मीनलने डाॅक्टर बनायचं असेल भविष्यात तर या गोष्टींकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघता आलं पाहिजे असं दरडावून बजावलं. तास संपला अखेर.नंतर ब्रेक असल्याने ती वर्गातून निघत असताना काही मुली येवून तिला भेटल्या.किशोरवयीन मुलं आणि मुले नेमकं कुठल्या मानसिक आणि शारीरिक बदलातून जातात याची तिला पूर्ण कल्पना होती.त्यामुळे जेव्हा त्यातील एका मुलीने सांगितल्यावर की “ मॅम निखिल खूपच माझ्या मागे येतो घरापर्यंत सायकलने पाठलाग करतो.शाळेतही माझा हात पकडतो.त्याचे मित्र हसतात.मला खूप भीती वाटते.” असं म्हटलं होतं आणि ती मुलगी प्रिया होती हे आता आठवताच मीनलने क्षणार्धात कार मागे शाळेकडे वळवली.तिला लांबून प्रियाशी एक मुलगा बोलताना दिसला.कदाचित तोच निखिल असावा.श्रीमंत घरातील बिघडलेला मुलगा भासत होता.
तिने दोघांना रागवून घरी जाण्यास सांगितले आणि तीही घरी परतली.
दुसर्याच दिवशी शाळेत मीनलने
स्टाफ रुममध्ये प्रियाला बोलावून रागवले.तुझ्या आईबाबांना मी फोन करून सांगणार म्हटल्यावर प्रियाने रडत रडत खरं सांगितलं.तो मुलगा तिला बोलली नाहीस, भेटली नाहीस तर बदनाम करण्याची आणि तिचे सोशल मिडियावरून फोटोंचा गैरवापर करण्याची धमकी देत होता.
घाबरून प्रिया दोनवेळा त्याला भेटली होती.ते ऐकून मीनलने तिला धीर दिला.मीनलने प्रियाच्या डायरीत आईला भेटायला येण्यासंबंधी नोट दिली.ते पाहून प्रियाने जे सांगितलं त्याने मीनल हादरून गेली.गेले कित्येक दिवस प्रिया आईशी बोलण्याचा प्रयत्न करत होती.पण तिची आई “आज ऑफिसमध्ये थकलेय फार नंतर बोलू”करून टाळत होती.प्रिया रोज
शाळेतून घरी जायची.किल्लीने कुलूप उघडून रिकाम्या घरात.
आईवडील उशीरा घरी येत.
अभ्यास, ट्यूशन्स आणि आता हे प्रकरण प्रिया सारं एकटी झेलत होती.त्यामुळे पालक सभेतही अनेकदा ती यायची नाही.प्रिया म्हणाली “ मॅम आईला वेळच नसतो.तिचं प्रमोशन झालंय.तिला डायरीतील नोट वाचूनही फरक पडेल असं वाटत नाही.” प्रिया दिवसेंदिवस कोमेजून चालली होती.मीनलने आता मात्र पाऊल उचललं.निखिलच्या पालकांना, निखिलला प्रिन्सिपॉल पुढे उभं केलं.प्रिन्सिपॉलने मीनल वर विश्वास ठेवल्याने त्या मुलाला शाळेतून सहा महिन्यांसाठी हाकलून दिलं.पण याने प्रश्न सुटणार नव्हता याची मीनलला पूर्ण जाणीव होती.आता कदाचित जास्त धोका होता प्रियासाठी.
एकदिवशी मीनल सरळ प्रियाच्या घरी जाऊन ठेपली. अर्थातच उशीरा तिचे आईवडील आले.
मीनलने कठोर शब्दांत त्यांना सत्यपरिस्थिती सांगितल्यावर ती दोघं भानावर आली होती.एक पालक म्हणून प्रियाला या वयात आणि इथून पुढेदेखील वेळ देणं महत्त्वाचं आहे हे उशीरा का होईना
पण दोघांना पटलं होतं.मीनलचे दोघांनीही आभार मानले.प्रियाच्या आईने दुसऱ्याच दिवशी जाऊन प्रमोशन नाकारून अर्धा दिवस नोकरीनिमित्त घराबाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता.
प्रियाने हाक मारली, “मॅम” वाकून नमस्कार करणाऱ्या प्रियाला मीनल टीचरने कधीचंच कवेत घेऊन आपलंसं केलं होतं.
©️®️श्रध्दा(इरावती)सुदामे
५जानेवारी२०२६

Comments
Post a Comment