कथा - वाडा चिरेबंदी
कथा - वाडा चिरेबंदी
रामू गड्याने तांबडं फुटताच वाड्याचा शिसवाचा दरवाजा उघडला. रखमाने वाड्यातील एक एक करून सारे कंदील मालवले.अंगण सारवून सडा घातला. विठू दुधाची धार काढायला गोठ्यातील गाईंकडे गेला.रखमा शेणगोठा आटोपून चूल पेटवतच होती तेवढ्यात सुशिलाबाईंनी चहासाठी आवाज दिला. सुशिलाबाईंची सकाळपासून गडबड चालू होती. गुरुपौर्णिमेचाउत्सव म्हणजे भक्तीचा लोट वहातअसे शिर्डीतील साईबाबांच्यादर्शनाला.सुशिलाबाईंसारख्या अतिशय साध्वी प्रेमळ माऊलीला साईबाबांच्या दर्शनाची आस लागली होती. सुधाकरराव काटे सुशीलाबाईंचे यजमान तलाठी होते.अधिकार आणि श्रीमंतीचा डौल त्यांच्यात नेहमी दिसे.
राहत्याचा पूर्वजांचा वाडा अगदी छान जपला होता त्यांनी. दगडी बांधकाम, तुळशीवृंदावन, बाजूला शेतातून आलेली धान्याची पोती,अंगणात विहीर, माजघर अशा पंधरा एक खोल्यांचा वाडा. शिर्डीपासून एक दोन किलोमीटर अंतर होतं राहता गावाचं. राहत्याच्या द्राक्षाच्या बागा त्यांच्याच मालकीच्या. सुख पाणी भरत होतं म्हणा ना वाड्यात. कमतरता होती एका गोष्टीची.ती म्हणजे पन्नाशी उलटली तरी सुशिलाबाई वारस देवू शकल्या नव्हत्या या वाड्याला.आता तर त्यांनी आशा सोडलीच होती पण परमेश्वरावरील भक्ती नाही.नेहमी हसतमुख असायच्या सुशिलाबाई आणि सुधारकररावांनी देखील कधी मूल नसल्याबद्दल चकार शब्द काढला नव्हता.दुपारी चार वाजता सुधाकरराव पडवीतील झोपाळ्यावर झुलत असायचे.रामू गडयाने विड्यांची पानं पितळेच्या खलबत्त्यात कुटून तांबूल बनवून सुधाकररावांना पेश केलं की ते रंगात यायचे.तोंडात तांबूल चघळत झोपाळ्यांच्या कड्यावरून दाही अंगठ्यांचा हात फिरवत लोकांच्या तक्रारी ऐकत.आणि न्यायनिवाडा करत.मनाने फार मोठा माणूस. कधीच रिकाम्या हाताने वाड्यातून कुणी परत जात नसे.
ठरल्याप्रमाणेसकाळी सात वाजता टांगा वाड्यासमोर आला.सुशिलाबाई पूजेचे ताट, नेवैद्य घेऊन टांग्यात जाऊन बसल्या.गेली वीस वर्षे न चुकता त्या गुरूपौर्णिमेला शिर्डीला जात.हजारो भाविकांना ह्या कुटूंबाकडून महाप्रसाद असे.गरिबांना वाटण्यासाठीचे कपडे कालच पोहोचले होते शिर्डीत.मंदिरात पोहोचल्यावर सुशिलाबाईंनी पुजार्याला तयारी करण्यास सांगितली.थोड्यावेळात सुधाकरराव देखील येऊन पोहोचले.उभयतांनी साग्रसंगीत पूजा आटोपून अन्नदान केले.गोरगरीब समाधानाने उभयतांना आशिर्वाद देवून जात होते. दिवसभर मंदिराच्या सभामंडपात टाळ मृदुंग आणि भजन याचा नाद यात गावकरी तल्लीन होऊन जल्लोष करत होता.रात्री भक्तीगीताचा कार्यक्रम आयोजित केलेला होता.संध्याकाळ झालीदेखील आणि अचानक सुशिलाबाईंना तातडीने वाड्याहून सांगावा आला.त्या मंदिराच्या आवारातून घाईने टांग्याकडे धावल्या. खबरच अशी होती की टांगेवाला चाबकाचे वार करत होता बिचार्या घोड्यावर. त्यामुळे वाऱ्याच्या वेगाने घोडा धावत होता.वाड्यासमोर टांगा पोहोचला.बाहेर बायाबापड्यांची गर्दी बघून सुशिलाबाईंच्या काळजाचा ठोका चुकला होता.पावलं जड झाली होती.वाड्याच्या आत चौकात एक नुकतेच जन्माला आलेलं बाळ कुणीतरी ठेवून निघून गेलं होतं.सुशिलाबाईंच्या ममतेला पान्हा फुटला होता. आवेगाने सुशिलाबाईंनी बाळाला उचलून आपल्या पदरात घेतलं.रखमाला सांगून न्हाऊ घातलं. घमेल्यातील शेक दिला.गोठ्यातील गाईचं दूध पाजलं.बाळाला काळं तीट लावलं. देव्हार्यासमोर बसून सुशिलाबाईंनी देवाचे आभार मानले.परमेश्वराने गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रसाद दिला होता.प्रचंड इच्छाशक्ती, ईश्वरचरणी ध्यास आणि संयमाने प्रार्थना यामुळेच वाड्याचा वारस माऊलीच्या झोळीत होता. आता तर खऱ्या अर्थाने उत्सव सुरु झाला होता.पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात चिमुकल्या हातांनी चांदणफुलांचा जणू वर्षाव होत होता.त्यात न्हाऊन दिमाखात उभा होता सजलेला “वाडा चिरेबंदी” ..
©️®️श्रध्दा(इरावती)सुदामे
६जानेवारी२०२६
८८३०७८४१०३

Comments
Post a Comment