कथा- गत जन्म शोधताना भाग - १

गत जन्म शोधताना

लहान मुलींचा घोळका खेळत होता.त्यादिवशी संध्याकाळी

नेमकी अमावस्या होती.

दिवेलागणीला वेळ झाली होती पण पोरींचा लपंडावाचा खेळ चांगलाच रंगला होता.प्रियावर डाव होता.डोळ्यावर पट्टी बांधून ती लपलेल्या मैत्रिणींना शोधू लागली.मोकळं मैदान आणि पलीकडे पडकी काही घरे.तिथे सध्या कुणीच रहात नव्हतं.सुमारे 

पंधरा मिनिटं बिचारी प्रिया शोधत 

होती पण कुणीच मैत्रीण आऊट होईना.त्या झाडावर चढल्या होत्या .काही सिमेंट पाइपलाइन मध्ये लपल्या होत्या.प्रिया उलट्या दिशेने चालत चालत त्या पडक्या घरापर्यंत पोहोचली. प्रिया दारातून आत गेली. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत आणि तिने घाबरून डोळ्यांवरची पट्टी काढली. पोरींचा हसण्याचा आवाज मंद ऐकू येत होता.एक जिना चढून प्रिया आवाजाच्या दिशेने जात होती.समोर तिला परकर पोलक्यातल्या दोघी तिघी पळत जाताना गायब झालेल्या दिसल्या.ओळखीच्या होत्या का त्या? पण नीट समोर का येत नव्हत्या? पुन्हा पैंजण वाजले कुणीतरी धावत होतं .प्रियाने पाहिलं एकजण खांबाआड लपून तिला खुणेने ये असं म्हणत होती.प्रिया भारावून पुढे पुढे चालत होती आणि तितक्यात तिच्या लपलेल्या मैत्रिणी मागाहून हाक मारत आल्या.त्यांना प्रिया बराचवेळ दिसेना म्हणून लपंडावाचा खेळ थांबवून त्या इथवर पोहोचल्या होत्या.कसंतरी त्यांनी प्रियाला भानावर आणलं आणि सगळ्या घरी परतल्या.

त्यादिवशी रात्री प्रिया झोपेत असताना बडबडत होती.आईने दुर्लक्ष केलं.सकाळी उठल्यावर प्रियाला आईने विचारलं “स्वप्न बघत होतीस वाटतं रात्री झोपेत” पण प्रियाला काहीच आठवलं नाही.दिवसभर शाळा, अभ्यास, खेळणं असा प्रियाचा दिवस गेल्यावर रात्री थकून गाढ झोपली.आजही ती स्वप्नात बोलत होती,हसत होती.प्रियाच्या आईने ऐकलं की ती मृण्मयी,माळ्यावर सागरगोट्या, बकरीला चारा घालायचाय.ही वाक्य बोलत होती.

सकाळी उठून आईने स्वप्नाचा उल्लेख केल्यावर प्रियाने “जुनाट घरी जुन्या मैत्रिणींबरोबर खेळत होते.”असलं उत्तर दिलं अन् ती शाळेत पळाली.ही रोजची स्वप्नांची मालिका दिवसेंदिवस वाढत चालल्याने काळजीचा विषय बनू लागली.कारण हल्ली प्रिया जागेपणी स्वप्नातील मैत्रिणींबद्दल बोलत असे ज्या कधी अस्तित्वातच नव्हत्या.आजतर तिने  पूर्वीसारखा परकर पोलकं शिवून दे म्हणून हट्ट केला. जो तिने कधी शिवलाच नव्हता.

घाबरलेल्या प्रियाने डाॅक्टर कुलकर्णींची भेटीची वेळ मागितली.

क्रमशः 

©️®️श्रध्दा(इरावती)सुदामे

१४जानेवारी२०२६



Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की