कथा -


सोल मेट 

डिअर हजबन्ड ,

आज मला पत्र लिहायचा मूड आलाय. कारण म्हटलं तर काहीच नाही आणि म्हटलं तर बरंच काही.म्हणजे झालं असं…काल पुस्तकाच्या कपाटातून एक पत्र डोकावून बघत होतं..”लोकं लिहायला विसरली का नाती विसरली ?”,जुनं जीर्ण पिवळसर पत्र जणू मला विचारत होतं,“हल्ली माझा मीच झोपेत चालत असतो, जमलेली माझ्यावरची धूळ साफ करत असतो.पण तरी मोबाईल सारखा पाॅश दिसत नसतो;ओल्ड फॅशन वाटतो.”टपकन माझ्या डोळ्यातला पाण्याचा थेंब त्या पत्रावर पडला.पत्रांनी किती मैत्रिणी होत्या जोडल्या .किती आठवणी होत्या आपल्या या पत्रांत दडल्या. कसं सांगू पत्राला तुला नाही रे विसरले पण या मोबाईल मध्ये थोडी हरवले.म्हणून आज परत पत्र लिहायला बसले.आठवतात ना तू मला नि मी तुला लग्ना आधी लिहिलेली पत्रं.त्यावेळी मोबाईल तर नव्हताच पण लॅन्ड लाइन सुध्दा महाग वाटायचा.टेलिफोन बूथवरून करायचास तू कधीतरी फोन मला.त्यात तुझं डिफेन्स ट्रेनिंग. कडक शिस्तबद्ध. त्यामुळे फोनवरची काही मिनिटं तुझा आवाज ऐकून रडण्यात जायची.मग तू समजूत घालायचास.तुझी तब्येत बरी नसली तरी लपवत हसत बोलायचास. आपल्या दोघातलं अंतर खूप जाणवायचं फोनवर.पण पत्र लिहिताना अंतर कमी व्हायचं.  खरंतर आठ दिवस लागायचे पत्र पोहोचायला तुला कोचिनला एअर फोर्स बेसवर.आता व्हिडिओ काॅलवर बोलतो रोज तरी समाधान नसतंच .टचस्क्रीन असला मोबाईल तरी एकमेकांच्या स्पर्शातील संवेदना अजूनतरी व्हाॅट्स अप होत नाहीत ना म्हणून असेल कदाचित. तू तिथे सातासमुद्रापार आणि मी इथे.कितीही प्रगत असला AI  पण  माझ्या हृदयातील धडधड तो तुला वाचून सांगत नाही ना!तुझा AI नुसतेच माझे शब्द काॅपी करतो रे छान ,नक्कलही करतो अगदी हुबेहुब पण त्यात सोल मेटवालं प्रेमाचं फील नाही ना .स्नॅपचॅट वर फिल्टर लावलेल्या फुलाच्या फोटोला पुस्तकात अजूनही तुझ्या जपलेल्या पत्रातील गुलाबाचा सुगंध नाही ना? या पत्राच्या पानाला सुध्दा तुला सुगंध जाणवेल .बघ तर ..हो ना..पत्रास अजून कारण म्हणजे एक गुड न्यूज द्यायचीये. आपल्या मनीला खूप गोड पिल्लं झाली आहेत. एक पांढरा रंगाचं आहे आणि बाकी 3 ब्राऊन. रागवणार नाहीस ना..मी सध्या तू नाहीयेस म्हणून तुझ्या स्टडी रूममध्ये त्यांचा बेड केलाय.पत्रास अजून एक कारण म्हणजे आपण लावलेला रातराणीचा वेल छान बहरलाय.रोज रात्री रातराणी आणि मोगरा soul mate सारखी रूंजी घालत असतात आपल्या बेडरुमच्या खिडकीपाशी.त्यावेळी आणखीनच येते तुझी आठवण.पत्र खूप लांबलय.आटोपते आता.तुझं प्रोजेक्ट संपव पटकन आणि ये लवकर.मी वाट पहातेय.काळजी घे. बाकी पुढच्या पत्रात.

तुझीच…अनामिका.

©️®️श्रध्दा (इरावती) सुदामे 

२०जानेवारी २०२६




 



Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की