कथा ४ - विटाळ
कथा ४ - विटाळ
गौरीगणपतीचा सण आणि काही केल्या पाऊस काही उघडत नव्हता.कोकणातला पाऊस दारिद्र्याने पिचलेल्या माणसाला सवयीचा झाला होता.पावसाची भीती फक्त तुम्हाआम्हालाच.या पावसातही वेंगुर्ल्यातील घराघरात बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू होती. पार्वती आजींची लेक, नातू , जावई खास गणपतीकरता मुंबईहून आले होते वेंगुर्ल्यात. पार्वती आजी चुलीपाशी न्याहारीची तयारी करत होत्या. एकीकडे चहासाठी आधण ठेवलेले होते.सूनबाई देवपूजेसाठी बागेत फुलं आणायला गेली ती एक तास झाला तरी परतली नव्हती. मुलगा कालचा रात्रपाळीच्या ड्यूटीवरून आला नव्हता.इकडं ओढ्याचं पाणी वाढत चाललं होतं.
तेवढ्यात पार्वती आजींची सून केतकी आली.आजींच्या नातवाने मामी आलीऽऽ म्हणून घरात वर्दी दिली.थोडी भिजली होती केतकी पावसात.आजी ओरडल्या केतकीला, “आज दुपारी जेवणं आटोपली की गणपतीची आरास करायला घ्या गं.पुरुष माणसं गणेशाची मूर्ती संध्याकाळी घेऊन यायचीत.न्याहारी आटोपून स्वयंपाकाला लागू. तिघीजणी बायका मिळून पटापट आवरू.”आजींचा उत्साह ओसंडून वहात होता.केतकी दारापाशी तशीच उभी होती.आजी ओरडल्या “अगं काय आता आरती करायची राणीसरकार?” तसं केतकीचे डोळे पाणावले.”अगं काय?” मानेनेच केतकीने सांगितल्यावर आजी समजायचं ते समजल्या आणि तारस्वरात ओरडू लागल्या.
मुलीला सांगू लागल्या “ महाराणी आता चार दिवस आराम करत लोळणार. विटाळ झालाय यांना.मी आहेच सेवा करायला.बरोबर मुहूर्त निवडला हिने.” आणि आदळ आपट करत माजघरात निघून गेल्या.आजींचा नातू हे बघत होता.आईला प्रश्न विचारत होता. “विटाळ म्हणजे गं काय?” “मामीला कावळा शिवलाय”.
केतकी अंग चोरून वरच्या खोलीत
गेली.गोणपाट अंथरून त्याच्यावर नेहमीची साडीची गोधडीची वळकटी पसरली आणि निमूट बसली.पार्वती आजींनी नाश्ता आणून दिला.पाण्याचा तांब्या ठेवून
जाता जाता पुटपुटल्या गिळा आणि पसरा. “नशीब माझं गौरी पूजेपर्यंत मोकळ्या होतायेत बाईसाहेब.”
आजींचा नातू राघव लपून हे सारं पहात होता.केतकी मामीशी त्याची
खूप दोस्ती होती.ती त्याची पत्ते खेळताना पार्टनर असे.सागरगोट्या एवढंच काय ठिक्कर बिल्ले तिनंच तर शिकवलं होतं राघवला.दुपारी तो जेवण करून हळूच वरच्या खोलीत आला.मामी तिला वाढून दिलेलं थंडगार झालेलं जेवण कसंतरी घशाखाली उतरवत होती.नवरा अजूनही पावसात अडकल्याने ती सारखी खिडकीबाहेर डोकवत होती. राघवला बघून तिला बरं वाटलं.मांडीत तो बसणार तसं केतकीने राघवला तिला स्पर्श न करता दूर बसायला
सांगितलं. “मामी तू काही अपराध केला आहेस का? तुला शिक्षा का
दिली आहे अशी एकटं या खोलीत
बसायची?”राघवच्या प्रश्नांवर केतकी हसून म्हणाली “ बाईपणाची शिक्षा आहे बाळा..तू लहान आहेस.” त्यानंतर तिने राघवला छान गोष्ट सांगितली.
रात्री राघव आईबाबांबरोबर झोपला होता.पण झोप येत नव्हती.सारखी मामी आठवत होती.तो हळूच उठून वरच्या खोलीत गेला.मामी पाय पोटाशी जवळ घेऊन झोपली होती.राघवने तिला आपली दुलई पांघरली.आणि तोही तिच्या कुशीत जाऊन झोपला.
पहाटेस केतकीने राघवला उठवून
घाबरत घाबरतच त्याच्या रूममध्ये
सोडले.कुणाच्याच लक्षात आले नसावे.केतकीने देवाचे आभार मानले.
केतकीचे यजमान सायकल हातात धरून सकाळी परतले.सासूने तुझ्या बायकोचा विटाळातला हक्काचा आराम चाललाय
सांगितल्यावर तो न बोलताच न भेटताच जावयाबरोबर गणपती पूजेच्या तयारीत लागला.केतकी डोळ्यांतलं पाणी लपवत गोणपाट गुंडाळून खोलीची झाडलोट करत होती बिचारी.
बाई असण्याची एवढी का रे शिक्षा
देवा असं तिचं मन रोज आक्रंदन करे.तिचं शिक्षण, कला, गुण या विटाळाच्या चार दिवसात कुणालाच आठवत नसत.एवढंच काय ती जिवंत आहे ह्याचाही जणू
विसर पडे.लग्नाला पाच वर्ष होऊनही मूलबाळ न झाल्याने सासूचा नवर्याचा रोष होताच तिच्यावर.
सकाळ संध्याकाळ गणपतीच्या आरत्या अथर्वशीर्ष खोलीतूनच ऐकत चार दिवस निघाले केतकीचे .चौथ्या दिवशी सासूने पहाटेस चुलीवर पाणी गरम करायला ठेवलं.केतकीला न्हाणीघरात जायला सांगून तिच्या डोक्यावर दोन तांबे ओतले .केतकीचा आंघोळीनंतर विटाळ संपणार होता.तिने सगळ्यात आधी बाप्पाचे दर्शन घेतले.उद्याच्या गौरींच्या आगमनाची तयारी करण्यास तिची लगबग सुरू झाली.राघवने निरागसपणे विचारलं “ मामी मी तुझ्या मांडीत
बसू आता?” केतकी आणि राघव पडवीतील झोपाळ्यावर झुलत होते राघवच्या मायेने केतकीचे डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते.
©️®️श्रध्दा(इरावती) सुदामे
मोबाईल ८८३०७८४१०३
४ जानेवारी २०२६

Comments
Post a Comment