कथा क्रमांक - ८ सोळावं वरीस
सोळावं वरीस
मानसीचा केंद्रीय विद्यालयातील पहिलाच दिवस.नवीन नोकरीतील उत्साह ,विद्यार्थ्यांविषयी कुतूहल असं मनात संमिश्र भाव येत होते तिच्या. मानसी काहीशी कडक तरी शांत दिसणारी शिक्षिका होती.
तिला व्यक्तिमत्त्व खुलेल असं रहायला आवडे.पस्तीशीतील असूनही ही टीचर शाळेतील मुला मुलींची पटकन मैत्रीण बनली.
अकरावी बारावीतील ही सोळा सतरा वर्षांची मुलं.यानंतर त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण मिळणार असतं.त्यामुळे मानसी पण अधिक मन लावून शिकवायची.
मानसीचा विषय होता भौतिकशास्त्र.विद्यार्थ्यांना हा कठीणच वाटायचा रसायनशास्त्र व जीवशास्त्र यांच्यामानाने.
इंजिनिअरिंगचं ध्येय असणारी काही हुशार मुलं होती तिच्या वर्गात. त्यातच “तो”ही होता…आदित्य.अतिशय हुशार, शांत आणि महत्वकांक्षी मुलगा.
मानसीला खरं म्हणजे आदित्यच्या क्लासवर शिकवताना दडपण यायचं.आय.आय.टी.पातळीवरचे
प्रश्न चुटकीसरशी सोडवणारी ही बॅच होती.त्यामुळे तिच्या त्यांच्याकडून अपेक्षा उंचावलेल्या होत्या.बोर्डात नव्व्याण्णव टक्केंच्यावर मार्क नक्की मिळवणार ही मुलं.आदित्य तर दहावीतही बोर्डात आला होता.
त्यादिवशी बारावीची शाळेची चाचणी परीक्षा होती.मानसी प्रश्न पत्रिका वाटून खुर्चीवर बसली. पेपर सुरू झाल्याची घंटा वाजली.मुलं लिहीत होती.तिच्या काही वेळाने लक्षात आलं आदित्य लिहीत नाहीये.त्याला मानसीने खुणेनेच पेपर लिही म्हणून सांगितलं.तर तो हसला आणि मानेनेच नाही असं काहीतरी केल्यासारखं वाटलं तिला.तिला वाटलं नसेल द्यायचा पेपर. तसंही या परीक्षेला बोर्डात कुठे पकडणार म्हणून तिने दुर्लक्ष केलं.त्यानंतर दुसर्या दिवशी शिकवताना परत शांत असणाऱ्या आदित्यच्या मनात चलबिचल सुरु आहे असं वाटलं..दोन तीनदा मानसीने पाहिल्यावर तो तिच्याचकडे टक लावून बघतोय असं वाटून ती थोडी विचलित झाली.स्टाफ रूम मध्ये आदित्यचं वागणं चर्चा करावी का? की कुणाच्या हे लक्षात नसेल आलं?तिने कुणाशी न बोलताच विचार काढून टाकला.पण हे दररोज होऊ लागलं होतं.आणि तिच्या लक्षात आलं की आजूबाजूची पाच सहा मुलं आदित्यला मानसी वर्गात आली की इशारा करत आणि आदित्य चक्क लाजत असे.अरे देवा…काय झालं ह्याला! त्याच्याशी बोलावं का? की सोडून द्यावं ?
एक दिवशी आदित्य अभ्यासात अडचण आहे म्हणत तिच्यामागे आला.मानसीने स्टाफ रूममध्येच त्याला तो टाॅपीक शिकवला खरा.पण ती त्याचं मन वाचत होती.
दुसर्या दिवशी पण तेच ..असं रोज रोज होऊ लागलं. मानसीलाही कळत होतं आदित्यचं मन.सोळावं वर्ष लागलेला आदित्य तिच्यासाठी एका टीचरसाठी अस्वस्थ होत होता.त्याला तिचा सहवास मिळावा म्हणून अभ्यासाचे बहाणे बनवत होता.तिची मेरा नाम जोकर सिनेमातील सिमी गरेवाल झाली होती.मानसी आदित्य नाजूक वळणावर आहे तो दुखावला जाऊ नये म्हणून प्रयत्न करत होती.त्याने खास तिच्यासाठी आणलेलं गुलाबाचं फुल हसून घेत होती.तिला “सतरावं वर्ष” शाॅर्ट फिल्म मधील मुलगा म्हणजे आदित्य भासला आणि त्याला आवडणारी शेजारची वहिनी मुक्ता बर्वे आठवली.अशी मुलं खूप पझेसिव्ह, हळवी असतात. कसं यातून आदित्यला बाहेर काढावं?
त्याची परीक्षा फेब्रुवारीत असल्याने सहा महिने हातात होते.
मध्यंतरी मानसीने दोन दिवस शाळेत रजा घेतली.आदित्य खूप सैरभैर झाला होता असं कानावर आलं तिच्या.
त्या वर्गातील दोन तीन खूप शांत अभ्यासू मुलींशी ती बोलली.
आदित्यबद्दल त्यांनाही कळलं होतं एव्हाना.. एक दिवशी मानसी आदित्यला छान फिरायला घेऊन गेली.आणि तिथून आपल्या घरी नेलं.तिचा मुलगा पाचवीत होता.त्याची आदित्यशी ओळख करून दिली.नवरा आला त्याला मानसीने सांगितलं “आदित्य खूप हुशार मुलगा आहे,बोर्डात नक्कीच पहिला येणार.” जितक्या लवकर आदित्यला वास्तव कळेल तो भ्रमातून जागा होईल तितकं आवश्यक होतं.आणि तेही न दुखावता.मानसी आदित्यकडे आपल्या मुलाप्रमाणे बघत होती.वरचेवर ती मुद्दाम आदित्यला घरी तिच्या लहान मुलाला गणिताच्या अडचणी सोडवायला बोलवू लागली.तिचं कुटुंब ही तिची ओळख आहे.याचं आदित्यला हळूहळू भान येत गेलं. आणि त्याची गाडी एकदिवशी रूळावर आली.
किशोरावस्थेतील मानसिक चढ उतार ही नैसर्गिक आहे.या गोष्टी पूर्वीही घडत.हल्ली पण होतात. आदित्यसारखे विद्यार्थी आपल्याभवती दिसतात ते बिघडलेले निश्चित नसतात त्यांचं
फक्त मन हरवलेलं असतं.
©️®️श्रध्दा(इरावती) सुदामे
८जानेवारी२०२६
Comments
Post a Comment