ध्यास
ध्यास
बाबांची गोष्ट
“पुणे विद्यार्थी गृहा”चा १२मे ला ११७ वा वर्धापनदिन होता. त्यानिमित्त काल सोहळा आयोजित करण्यात आला होता.मला बाबांबरोबर तो सोहळा अनुभवता आला. पुणे अनाथ विद्यार्थी गृह इथे माझे बाबा वयाच्या पंधराव्या वर्षीपासून राहिले.बाबांचे वडील ते पाच वर्षाचे असताना गेले.सोलापूर जिल्ह्य़ातील माळीनगर इथे दहावीपर्यंत शिकून शिक्षणाच्या ओढीपायी बाबा पुण्यात आले.हाती पैसा नाही.घर नाही.अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा भागवून शिक्षण कसे घ्यावे याचा ध्यास बाळगत बाबा सदाशिव पेठेतील पुणे अनाथ विद्यार्थी गृहात राहू लागले. आश्रमात सांगतील ती कामं करावी लागत. जसं झाडलोट,दूध वाटणे,रूग्ण मित्र बनून आजारी विद्यार्थ्यांची सेवा करणे रात्री पहारा देणे इत्यादी.रोज पहाटे उठून गार पाण्याने आंघोळ, कामं व नंतर राम मंदिरात प्रार्थना असे. ज्यामुळे मनोबल वाढे .लाल मातीत असलेली तालीम जिथे बाबा व इतर तरूण मुले कुस्ती लढत. नंतर संस्थेच्याच आवारात खोल विहीरीत पोहणे.यामुळे शरीर तंदुरुस्त राही. हायस्कूल मधील मुलं माधुकरी(भिक्षा) मागून आणत आणि तयार स्वयंपाकात तिची भर पडे . मोफत राहून शिकणारी मुलं तिथे भोजन करीत.पुणे विद्यार्थी गृहाजवळ रंजना सायकल मार्ट नावाचं सायकलचं दुकान होतं.जिथून भाड्याने सायकल मिळे.अभ्यासात हुशार असल्याने बाबांना अकरावीत फर्ग्युसन काॅलेजात ॲडमिशन मिळाली होती.सदाशिव पेठेतून सायकलने ते फर्ग्युसन काॅलेजात जात. नंतर(COEP) गव्हरमेंट काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग ला मॅकेनिकल ब्रांचला शिकत असताना देखील बाबा अनाथ विद्यार्थी गृहात राहिले.१९६१साली पानशेत धरण फुटले. बाबा मृतदेह तुडवत वाट काढत विद्यार्थी गृहात पोहोचले.बघता बघता पुणे शहर पाण्यात बुडाले.त्या अंगावर शहारा आणणाऱ्या गोष्टी ऐकल्या.आम्ही जेव्हा तो परिसर फिरत होतो तेव्हा बाबा सगळं सांगत होते. संस्थेत मंगल कार्यालय होतं तिथे पूर्वी लग्नकार्य होत.बाबा उन्हाळ्याच्या सुट्टयात मुद्दाम घरी माळीनगरला जायचे नाहीत.कारण समारंभात कार्यालयात मदत केली की लोकांकडून बक्षीस म्हणून त्यांना पैसे मिळत.एकेका सुट्टीत बाबा घरच्यांसाठी दोनचारशे रूपये बक्षीस मिळवत स्वाभिमानाने काम करून. गरीब परिस्थितीची जाणीव असल्याने पैशाची किंमत होती बाबांना.आश्रमात श्रध्दानंद मंदीर, युधिष्ठिर मंदीर, व्यास मंदीर अशी नावं अजुनही तशीच आहेत तेथील मुलं रहात त्या खोल्यांना.एकेका खोलीत सहा सहा मुलं रहात विद्यार्थीगृहात.आपले कपडे धुणे खोली साफ ठेवणे. सतरंजीवर झोपणे .कठोर व्रत होते जणू. आरामाच्या कुठल्याही सुखवस्तूंशिवाय इंजिनिअरिंगचा अभ्यास करणे किती आव्हानात्मक असेल त्या काळी?डाॅ.ग.श्री.खैर ( गीतेवरील अभ्यासक व सदाचार चिंतनचे लेखक) हे कार्याध्यक्ष होते पुणे विद्यार्थी गृहचे. आणि नाना कश्यप हे संचालक होते .पुढे संस्थेचे कश्यप सर माझे मामा बनले.त्यांच्याच बहिणीशी बाबांचा विवाह झाला.बाबांसारखा होतकरू हुशार मुलगा त्यांना खूप आवडला.आणि आपली बहीणीचा जोडीदार म्हणून त्यांनी बाबांची निवड केली.आबासाहेब अशी प्रेमाने उपाधी दिली.माझा जन्म सदाशिव पेठेतील. बालपणी जेव्हा यायचो नाना कश्यप मामांकडे पुणे विद्यार्थी गृहातच घर असल्याने तेच राम मंदिर जिथे बाबा प्रार्थना करत आम्ही लहान भावंड खेळत असू.पण बाबांचे कष्टकरी आयुष्य इथेच गेलेय याची यत्किंचित जाणीवही आम्हाला नव्हती.आज पुणे विद्यार्थी गृहाचे मुक्तांगण स्कूल, इंजिनिअरिंग काॅलेज अस्तित्वात आले आहे.लाखो मुले लाखो रूपये फी देऊन शिकत आहेत.पण बाबांच्या काळातील हजारो तरूणांचे कष्ट मेहनत यामागील पाया आहेत, स्तंभ आहेत.ही पिढी आता वय वर्ष ऐशी ते शंभर मध्ये आहे.ही सगळी मंडळी मला परवा संस्थेत भेटली. कुणी डाॅक्टर, कुणी कमिशनर, कुणी इंजिनिअर कुणी प्राध्यापक अशा मोठमोठ्या डिग्र्या घेऊन मोठी पदं भूषवलेली पिढी एके काळी अनाथ म्हणून कमवा आणि शिका योजनेमुळे महान बनली होती.आज ही मंडळी निवृत्त झाली होती.आजोबा झाली होती.त्यातच माझे बाबाही होते.पुणे विद्यार्थी गृहात मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून आपल्याकडून बाबांनी देणगी दिली आणि आम्ही भूतकाळातील आठवणी सोबत घेऊन प्रसन्न चित्ताने घरी आलो.
©️श्रध्दा सुदामे
Comments
Post a Comment